चिपळूणच्या महापुरात मृत्यू झालेल्या अपरान्त रुग्णालयातील आठजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख
चिपळूण : चिपळूणमध्ये 22 व 23 जुलै 2021 रोजी महापूर आला. महापुरामुळे शहरातील अपरान्त कोव्हिड रुग्णालयामधील आठजणांचा मृत्यू झाला होता. अखेर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना एक विशेष बाब म्हणून राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून प्रत्येकी चार लाखांची आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले आहे. या बाबत त्यांनी रत्नागिरी जिल्हाधिकार्यांना आदेश दिले आहेत. सन 2021 साली चिपळूण शहरातील कै. अण्णासाहेब क्रीडा संकुलात अपरान्त कोव्हिड सेंटर सुरू करण्यात आले होते. या ठिकाणी उपचार घेणार्या आठ रुग्णांचा महापुरामुळे मृत्यू झाला. याबाबत चौकशी समिती नेमण्यात आली होती. या घटनेला वर्ष होत आले तरी मृतांच्या नातेवाईकांना कोणतीच मदत मिळालेली नव्हती. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दखल घेतली आहे. यासाठी आमदार शेखर निकम व आमदार जाधव यांनी पाठपुरावा केला. या संदर्भातील फाईल मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे होती.