
आडवली येथे ट्रॅक्टरखाली चिरडून एकजण ठार; चालक जखमी
राजापूर : तालुक्यातील आडवली येथे ट्रॅक्टर उलटून एकजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास घडली. जयराम रामसिंग जाधव (वय ५५, रा. विजापूर कर्नाटक ) असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे. तर तर ट्रॅक्टर चालक रामेश्वरलाल गाडरी हा जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी कोल्हापूरला येथे हलविण्यात आले आहे. याबाबत राजापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आडवली येथे रस्त्याचे काम आटोपून सायंकाळच्या सुमारास ट्रॅक्टरने जयराम जाधव व रामेश्वरलाल गाडरी घरी निघाले होते. मयत जाधव हे चालकाच्या शेजारी बसले होते. दरम्यान सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास आडवली येथील वळणावर ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ट्रॅक्टर उलटला. यावेळी चालकाच्या बाजूला बसलेले जयराम रामसिंग जाधव हे खाली पडले आणि ट्रॅक्टरच्या चाकाखाली सापडले यातच ते मृत्युमुखी पडले. तर ट्रॅक्टरच्या चालकाला गंभीर मार बसल्याने पुढील उपचारार्थ कोल्हापूरला हलविण्यात आले होते. अपघाताचे वृत्त कळताच राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉंस्टेबल ए. एम. तिवरेकर व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील मृतदेहाचा पंचनामा करुन तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या अपघात प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सायंकाळी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.