कोरोनाच मानगुटीवर बसलेले भुत अद्याप उतरलेल नसतानाच खेडमध्ये या साथीने डोकं वर काढलं

कोरोनाच मानगुटीवर बसलेले भुत अद्याप उतरलेल नसतानाच खेडमध्ये डेंग्यूसदृश्य साथीने डोकं वर काढलं असल्याने नागरिक अक्षरशः हतबल झाले आहेत. गेले काही दिवस खेडमध्ये डेंग्यूसदृश्य साथीची लक्षणं असलेले अनेक रुग्ण आढळू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह तालुका प्रशासन हबकून गेले आहे.
मार्च २०२० पासून खेडमध्ये कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढायला लागला आहे. कोरोना महामारीशी झगडता झगडता नागरिकांचा धीर सुटत चालला आहे. अनेकांच्या घरातील कर्ता पुरुष कोरोनाचा बळी ठरल्याने अनेक कुटुंब उद्धवस्त झाली आहेत. नोकरी, व्यवसाय कोरोनामुळे सारकाही ठप्प असल्याने
आर्थिक घडी पुरती विस्कटून गेली आहे.
ज्या कुटुंबावर कोरोनाची वक्रदृष्टी पडली त्या कुटुंबाची तर पुरती वाटच लागून गेली आहे. वैद्यकिय बिलं भरताना सर्वसामान्यांना कंबरडा अगदी मोडून गेला आहे. कधी एकदा या महाभयंकर महामारीचे उच्चाटण होतयं याची प्रत्येकाला प्रतिक्षा आहे. मात्र ठाण मांडून बसलेली कोरोना नावाची महामारी जायचे काही नाव घेत नसल्याने कोरोनाची भिती पाठीवर घेऊनच जगावे लागत आहे.
हे कमी की काय म्हणून आता यामध्ये डेंग्युची भर पडली आहे. गेल्या काही दिवसात खेड शहर व परिसरात डेंग्य सृदृश्य तापाची लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. डेंग्युपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन खेड नगरपालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. ठिकठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले आहे.
डेंग्युचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी घराशेजारी पाण्याचे डबके साचू देवू नये, पाणी उकळून प्यावे, तापाची लक्षणं दिसताच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा सुचना नगरपालिका आरोग्य विभागाकडून करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही डेंग्युचे रुग्ण वाढतच असल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.
गेले दीड वर्षे कोरोनाशी झगडता झगडता नागरिक गलीतगात्र झाले असतानाच आता डेंग्यूचे संकट कसे पेलावे हा प्रश्न येथील नागरिकांना पडला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button