हातखंबा येथे एसटी-कारच्या अपघातात दोघे जखमी
नाणीज : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा पोलिस मदत केंद्राच्या जवळील उतारावर एसटी बस व कारची सोमवारी सकाळी जोरदार धडक झाली. यात कारमधील दोघे जखमी झाले. या अपघातातील बस (क्रमांक एमएच 14, बीटी 0963) गणपतीपुळेहून इस्लामपूरच्या दिशेने चालली होती. याचवेळी कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने स्विफ्ट कार (एमएच 03, एएम 0613) जात होती. पोलिस मदत केंद्राजवळील उतारावर भरधाव वेगाने चाललेल्या कारने समोरून येणार्या एसटीला जोरदार धडक दिली. धडकेमध्ये कार रस्त्याच्या कडेला जाऊन कोसळली. या अपघातात दोन जण जखमी झाले आहेत. ललिता रामदास माहुरे (वय 82) व किरण रवी माहुरे (वय 45) दोघेही राहणार अमरावती , या दोघांना जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या हातखंबा येथे कार्यरत मोफत रुग्णवाहिकेने तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. रुग्णवाहिका तत्काळ दाखल झाल्याने या जखमींवर त्वरित उपचार करता आले. एसटी बस इस्लामपूर डोपोची असून शामराव नामदेव बनसोडे त्यावर चालक होते. अपघातामुळे काही काळ येथील वाहतूक विस्कळीत झाली.