रेल्वे प्रवासात साडेतीन लाखांची चोरी
खेड : कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव-नागपूर एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या तरुणीची बॅग अज्ञात चोरट्याने लांबवली. बॅगेतील ३ लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज त्याने लांबवला. ही घटना दि. २३ मे रोजी खेड रेल्वे स्थानकात पहाटे ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
सोनल राज ओबेरॉय (वय २०, राहणार नेरुळ, नवी मुंबई – वेस्ट) हिने पोलिसांकडे तक्रार दिली. खेड रेल्वेस्टेशन येथे ट्रेन थांबून सुटत असताना अनोळखी इसमाने ओबेरॉय हिच्या हातातील हॅण्डबॅग अज्ञाताने काढून घेतली व ट्रेनमधून उडी मारुन तो पळून गेला. ओबेरॉय यांच्या बॅगमध्ये १ लाख ८५ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन, १ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे ब्रेसलेट, २२ हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल, तीन हजार रुपये किमतीचा लेन्सकार्ड कंपनीचा चष्मा असा एकूण ३ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करत आहेत.