पोलिस भरतीतील लेखी परिक्षेत डमी उमेदवार बसवून नोकरी मिळवली, दोन आरोपी अटकेत एक फरारी,रत्नागिरीतील प्रकार
पोलिस भरतीतील लेखी परिक्षेत डमी उमेदवार बसवून परिक्षा पास होउन रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात नवप्रविष्ट चालक म्हणून नोकरी करत शासनाची फसवणूक करणार्या पोलिस कर्मचार्याला आणि त्याच्या सहकार्याला शहर पोलिसांनी अटक केली.या सर्व गुन्ह्यातील तिसरा संशयित हा परीक्षेला बसणारा डमी उमेदवार असून तो अजून फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या दोन्ही संशयितांना न्यायालयाने सोमवारी 27 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
गजानन दत्ता चकोते (29,रा. माळकोल्हारी, ता किनवट. जि. नांदेड) आणि पदमसिंग पुनमसिंग बमावत (राजपूत) (25, रा.टाकळेवाड ता. गंगापूर जि. औरंगाबाद) अशी पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.त्यांच्याविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती ज्ञानदेव जगताप यांनी तक्रार दिली आहे.त्यानुसार, पोलिस भरती 2019 च्या चालक पोलिस शिपाई पदासाठी गजानन चकोते याने 13 ऑक्टोबर 2021 रोजी होणार्या लेखी परिक्षेला स्वतःच्या जागी डमी उमेदवार बसवला होता. त्यासाठी त्याने पदमसिंग बमावत याच्याशी सुमारे 7 लाख 50 हजार रुपयांचा आर्थिक व्यवहार केला.
त्यानंतर या दोघांनी या गुन्ह्यातील तिसर्या संशयिताला डमी उमेदवार म्हणून लेखी परीक्षेला बसवले. डमी उमेदवाराने परिक्षेवळी हजेरीपट व उत्तरपत्रिकेवर मूळ आवेदक गजानन चकोतेसारखीच सही केली. परिक्षा पास झाल्यावर चकोतेने रत्नागिरी जिल्हा पोलिस दलात नोकरी मिळवून या तिघांनी एकमेकांच्या संगमताने शासनाची फसवणूक केली.
दरम्यान, गजानन चकोते रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाच्या आस्थापनेवर नवप्रविष्ठ चालक पोलिस शिपाई या पदावर भरती झालेला होता. तो रत्नागिरी पोलिस मुख्यालय येथे मुलभूत प्रशिक्षण घेत असताना त्याचे वागणे संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले. त्याची चौकशी केल्यावर त्याने आपण एकाशी साडेसात लाख रुपयांचा व्यवहार करून त्याव्दारे डमी उमेदवारास परीक्षेला बसवून भरती झाल्याचे कबूल केले.
शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून या प्रकरणात चकोतेला मदत करणार्या पदमसिंग बमावतला औरंगाबादहून अटक केली. तो सर्हाईत गुन्हेगार असून त्याच्यावर पिंपरी चिंचवड, हिंजवडी, नागपूर व पालघर या ठिकाणी अशाच प्रकारचे शासनाची फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
www.konkantoday.com