राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई ; गोवा बनावटीच्या दारूचे हजार बॉक्स जप्त खेड तालुक्यातील लवेल येथे केली कारवाई
खेड :राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई येथील स्पेशल पथकाने मुंबई गोवा महामार्गावर मोठी कारवाई करत गोवा बनावटीच्या दारूचे हजार बॉक्स जप्त केले. ही कारवाई खेड तालुक्यातील लवेल येथे करण्यात आली. गोवा येथून गोवा बनावटीच्या दारूने भरलेला ट्रक मुंबईकडे जायला निघाला असल्याची खबर उत्पादन शुल्क विभागाच्या मुंबई कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांच्या स्पेशल पथकाने महामार्गावर पाळत ठेवून लवेल येथे हा ट्रक ताब्यात घेतला. दारूने भरलेला हा ट्रक सध्या उत्पादन शुल्क विभागाच्या खेड कार्यालयाच्या ताब्यात असून संबधीतांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
गोवा राज्यात तयार होणारी दारू मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रासह अन्य राज्यामध्ये वितरित केली जाते. गोव्यामध्ये स्वस्त मिळणारी दारु अन्य राज्यात दामदुप्पट दराने विकून दारूचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आपले उखळ पांढरे करत असतात. खरतर गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर उत्पादन शुल्क विभागासह पोलिसही पाळत ठेवून असतात मात्र उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पोलिसांच्या डोळ्यात धूळ झोकून दारूची ट्रॅफिकिंग करणारे दारू माफिया गोवा बनावटीच्या दारूचा व्यवसाय करत असतात.
गोवा राज्यातून गोवा बनावटीची विदेशी दारुचे बॉक्स भरलेला ट्रक मुंबईकडे निघाला असल्याची खबर मुंबई येथील उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती यानुसार अधिकाऱ्यांनी स्पेशल पथकाची स्थापना करून मुंबई गोवा महामार्गावर गस्त सुरु केली होती. उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी खेड तालुक्यातील लवेल येथे गस्त घालत असताना त्यांना गोव्याकडून मुंबईकडे जाणारा तो ट्रक आढळून आला. अधिकाऱ्यांनी तो ट्रक थांबवून तपासणी केली असता ट्रकच्या मागणी भागात गोवा बनावटीचे सुमारे १००० बॉक्स आढळून आले. अधिकाऱ्यांनी चालकांना याबाबत विचारणा केली असता तो संपर्क उत्तरे देऊन शकला नाही. अधिकाऱ्यांनी तो ट्रक दारूच्या बॉक्ससह ताब्यात घेऊन खेड येथील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात आणला.
या ठिकाणी उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी चालकाची कसून तपासणी करत असून दारू माफियांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करत आहेत. रात्री उशिरा पर्यंत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.