
दिव्यांग व्यक्तीशी विवाह करणाऱ्या चौघांचा शासनाकडून सत्कार
दिव्यांग व्यक्तीशी विवाह करणाऱ्या दिव्यांग नसलेल्या व्यक्तीना प्रोत्साहन निधी देण्याची योजना सामाजिक न्याय राबवत आहे. अशा 4 जोडप्यांचा सत्कार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्या हस्ते झाला. 2 लाख रुपयांचे वाटप करण्यात आले.
सामान्य प्रशासन विभागाच्या 17 जून 2014 रोजीच्या शासन निर्णय नुसार दिव्यांग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना दरवर्षी आयुक्त, दिव्यांग कल्याण, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयाकडून राबविण्यात येते. सन 2021-22 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन लाख अनुदान प्राप्त झालेले असून चार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली.
ही योजना समाजातील अपंगत्व असलेल्या व्यक्तींना सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे आपले कौटुंबिक जीवन व्यतीत करता यावे यासाठी आहे. दिव्यांग व अपंगत्व नसलेल्या व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन दिल्यास निश्चितपणे दिव्यांग व्यक्तींशी अपंगत्व नसलेल्या व्यक्ती विवाह करण्यास प्रोत्साहित होतील. याकरीता राज्यात आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर दिव्यांग व अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्याच्या योजनेस शासन निर्णयान्वये मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेसाठी प्रत्येकी पन्नास हजार रुपये सहाय्य अनुदान दिले जाते.
सन 2021-22 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यासाठी दोन लाख अनुदान प्राप्त झालेले आाहे. यातून तेजल विलास रेडीज (ता.खेड), विशाल श्रीधर महाडिक (ता. दापोली), संदीप रामा घडशी (ता.चिपळूण), संतोष शांताराम शिंदे (ता.चिपळूण) या चार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. इंदुराणी जाखड (भा.प्रसे.), अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी एस.बी. शेळके व जिल्हा समाज कल्याण अधिकारी अजय शेंडे यांच्या उपस्थितीत अपंग-अव्यंग जोडप्यांना, धनादेश, शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले.