दापोली पोलिस ठाण्याला लागलेल्या भीषण आगीत लेखनिक व पासपोर्ट विभाग जळून खाक…दारूगोळ्यासह बंदुका आगीतून बाहेर काढल्या म्हणून…
दापोली : येथील पोलिस ठाण्याच्या इमारतीत शनिवारी दि. 14 मे रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत लेखनिक विभाग व पासपोर्ट विभाग जळून खाक झाले.
पोलिस निरीक्षक यांच्या केबिनला लागून असलेल्या लेखनिक विभागाच्या खोलीमध्ये अचानक शॉर्टसर्किट होऊन आगीला सुरुवात झाली. बघताबघता या आगीने संपूर्ण खोली जळून खाक झाली. ही आग समोर असलेल्या पासपोर्ट विभागात पोहोचली. अग्निशमन दलाने राज्यपालांच्या दौर्यामुळे डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठ येथे बंब राखीव ठेवला होता, त्यामुळे बंब उशिरा पोहोचला. अग्निशमन दल दाखल होऊन त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. तोपर्यंत दस्तावेज, फर्निचर, कॉम्प्युटर व अन्य साहित्य जळून खाक झाले होते. पोलिस ठाण्याच्या समोरच्या बाजूने आग लागलेली असताना पाठीमागून जात कर्मचार्यांनी वरील पत्रे काढले आणि इमारतीतील साहित्य आगीपासून वाचवले. पोलिस निरीक्षक हेमंत अहिरे तसेच पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील व अन्य पोलिस कर्मचारी यांनी मेहनत घेऊन बरेचसे साहित्य सुखरूप बाहेर काढले. त्यांच्या मदतीला यावेळी दापोली शहरातील नागरिक धावले. जप्त केलेली दारू तसेच बंदुका व अन्य दारूगोळा प्रसंगावधान राखून वेळेत बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.