पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे जीवरक्षकांचा सत्कार
जिल्हास्तरीय सागरी सुरक्षा समन्वय समितीच्या बैठकीत पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे जीवरक्षकांचा बुधवारी सत्कार करण्यात आला.
जिल्ह्याच्या किनार्यावर गुहागर वेळणेश्वर दापोली, हरीहरेश्वर, मुरुड, कर्दे, गणपतीपुळे आरेवारे, रत्नागिरी, गणेशगुळे, गावखड़ी, कशेळी अशा अनेक ठिकाणी पर्यटक येतात. त्यापैकी हौशी पर्यटक समुद्रस्नानाचा आनंद घेण्यासाठी पाण्यात उतरतात. अनेक ठिकाणी पर्यटक समुद्राच्या पाण्यात बुडण्याच्या घटना घडल्या आहेत. परंतु अशा प्रसंगी अनेक नागरिकांनी धाव घेत पर्यटकांचा प्राण वाचवले आहेत. अशा जीवरक्षकांचा सत्कार रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्यावतीने बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालय, रत्नागिरी येथे आयोजित केला होता.
या सत्कार कार्यक्रमांत पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांच्या हस्ते जीवरक्षकांना प्रशंसापत्र, जिल्हा पोलीस दलाचे मानचिन्ह आणि पुष्प देण्यात आले. यामध्ये गणपतीपुळे रत्नागिरी – उदय पाटील, प्रितम मयेकर, प्रकाश डोर्लेकर, संजय मयेकर, प्रमोद डोर्लेकर, दिनेश सुर्वे, सचिन मयेकर, प्रशांत बोरकर, चेतन बोरकर, नितीन मयेकर, मुरुड – राजेश शिगवण, कर्दे – जगदीश नागवेकर, पाळंदे-अनिल आरेकर, अभिनय केळसकर, अभिजित बोरकर, जैतापूर – राजप्रसाद राऊत, नंदकुमार गवाणकर आदी जीवरक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सहाय्यक पोलिस अधीक्षक ॠषीकेश रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, उप विभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे, चिपळूणचे उप विभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी, लांजाचे उप विभागीय पोलिस अधिकारी निवास साळोखे, तटरक्षक दलाचे असिस्टंट कमांडंट गौरव आचार्य, सीमाशुल्क विभागाचे अधीक्षक जयकुमार व अन्य विभाग प्रमुख उपस्थित होते.