
कुर्ली येथे फासकीत अडकला बिबट्या; वनविभागाने केले पिंजऱ्यात जेरबंद
रत्नागिरी : तालुक्यातील कुर्ली गावात डुकरासाठी लावलेल्या फासकीत बिबट्या अडकल्याची घटना बुधवारी सायंकाळी 4.30 वाजण्याचा सुमारास उघडकीस आली. यावेळी गावकर्यांनी बिबट्याला पाहण्यासाठी गर्दी केली होती. समुद्रकिनारी असलेल्या डोंगराच्या पायथ्याजवळ झुडपात अज्ञात व्यक्तींनी फासकी लावली होती. बिबट्या अडकलेल्या ठिकाणाजवळ कुत्रे भुंकत असल्याने काही ग्रामस्थ पाहण्यासाठी गेले असता त्यांंना बिबट्या फासकीत अडकल्याचे आढळले. या घटनेची माहिती परिक्षेत्रीय वनाधिकारी प्रियंका लगड यांना देण्यात आली. सायंकाळी वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी पिंजरा घेऊन कुर्ली गावात दाखल झाले. बिबट्या ज्या ठिकाणी अडकला होता तेथे झाडी व भाग पूर्णत:निसरडा असल्याने बिबट्या अडकलेल्या ठिकाणी जाणे कठीण बनले होते. अंधार पडल्याने बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. रात्री 8 वाजण्याच्या दरम्यान बिबट्याला वनविभागाने पिंजऱ्यात जेरबंद केले. मोठ्या कसोशीने बिबट्याची सुटका करण्यात आली.
