
गाळ्याच्या आर्थिक वादातून तिघांनी केला खून; आंबा घाटातील मृतदेहाचे रहस्य उलगडले, स्थानिक गुन्हे अन्वेषणसह पोलिसांची कामगिरी
रत्नागिरी : गाळ्याच्या आर्थिक व्यवहारावरून वाद झाला आणि त्यातून तिघांनी मिळून अडसर ठरणार्याचा खून केला. त्यानंतर त्याला आंबा घाटातील खोल दरीत फेकून दिले. आंबा घाटात आढळून आलेल्या या मृतदेहाचा उलगडा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व पोलिसांनी केला आहे. कसोशीने तपास करत या प्रकरणाचा छडा लावला आहे. मृत तरूण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे. या तिघांना देवरूख पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. महादेव किसन निगडे (वय 30 रा. तारदाळ, शिवाजी चौक, गणेश मंदिराजवळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे.
आंबा घाटातील खोल दरीत अज्ञात तरूणाचा मृतदेह शुक्रवारी आढळून आला होता. या मृतदेहाच्या मानेभोवती दोरी व दोन्ही हात बांधलेल्या स्थितीत असल्याने या तरूणाचा घातपात झाला असल्याचा अंदाज देवरूख पोलिसांनी बांधला. यानंतर देवरूखचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांनी तपासाची चक्रे फिरवली.
शहापूर (कोल्हापूर) पोलिस ठाणे येथील बेपत्ता महादेव किसन निगडे याचे वर्णन मिळते जुळते असल्याची माहिती प्राप्त झाली. यानंतर पोलीसांनी शहापूर पोलीस ठाण्यात हजर होत दाखल बेपत्ता प्रकरणाची पडताळणी केली. खबर देणार्याच्या घरी जाऊन मृताची आई संजना निगडे व चुलत भाऊ अक्षय निगडे यांना प्रेताचे व त्याच्या अंगावरील कपड्यांचे फोटो दाखवले. हे फोटो महादेव निगडे याचेच असल्याचे सांगितले. यानंतर त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी महादेव निगडे व सुरज मेहबुब चिकोडे (वय-24, रा. तारदाळ, मराठी शाळेजवळ, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) यांच्यात गाळ्याच्या आर्थिक व्यवहारावरून वाद असल्याचे सांगितले. यावरून सुरजची चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबूली दिली. गणेश राजेश शिवारे (वय-28, रा. स्वामी गल्ली, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व एक 17 वर्षीय अल्पवयीन मुलगा यांच्या मदतीने महादेव निगडे याचा खून करून मृतदेह आंबा घाटातील दरीत टाकल्याचे कबूल केले.
यानुसार दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता एकमेकांच्या संगनमताने गुन्हा केल्याची कबूली दिली. या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले व त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.