कुंभार्ली घाटाचा प्रशांत पालवणकर ‘राजा’, तर आर्या कवळे ठरली ‘राणी’
चिपळूण सायकलिंग क्लबने आयोजित केलेल्या बहादूरशेख नाका ते कुंभार्ली घाटमाथा या 29 कि. मी.च्या मार्गावर राज्यस्तरीय सायकल स्पर्धेत जिल्हास्तरीय गटात दापोली सायकलिंग क्लबच्या प्रशांत पालवणकरने प्रथम क्रमांक मिळवत कुंभार्ली घाटाचा राजा किताब पटकावला आहे. खेड सायकलिंग क्लबची आर्या कवळे ही ‘कुंभार्ली घाटाची राणी’ म्हणून पात्र ठरली आहे.
कुंभार्ली घाटाच्या नागमोडी वळणावर, तीव्र चढण आणि एका बाजूला खोल दरी यामध्ये प्रशांत पालवणकर याने बाजी मारली आहे. 22 किमीचे अंतर 56 मिनिटांत पार करत प्रथम क्रमांक मिळवला. त्यांचा छोटा भाऊ केतन पालवणकर यानेही तृतीय क्रमांक मिळवला. जिल्हास्तरीय गटात द्वितीय क्रमांक चिपळूणच्या रोशन भुरण यांनी पटकावला.
जिल्हास्तरीय महिला गटात खेड सायकलिंग क्लबच्या आर्या कवळे यांनी 22 किमीचे अंतर 1 तास 15 मिनिटांत पार करत प्रथम क्रमांक मिळवत ‘कुंभार्ली घाटाची राणी’ हा किताब पटकावला. द्वितीय क्रमांक दापोलीच्या मृणाल खानविलकर यांनी आणि तृतीय क्रमांक चिपळूणच्या धनश्री गोखले यांनी पटकावला. सर्वात लहान सायकलपटू 10 वर्षीय दापोलीचे सौरभ मोरे, साईप्रसाद वराडकर आणि चिपळूणचे चिन्मय सुर्वे यांनाही उत्तेजनार्थ बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
राज्यस्तरीय गटात हनुमंत चोपडे यांनी 29 कि.मी.चे अंतर 1 तास 9 मिनिटात पार करत प्रथम क्रमांक मिळवला. द्वितीय क्रमांक सिद्धेश पाटील, तृतीय क्रमांक ओंकार खेडेकर, चौथा क्रमांक आर्यन मारळ, पाचवा क्रमांक विठ्ठल भोसले, सहावा क्रमांक सोहेल मुकादम यांनी पटकावला.