लोटिस्मात भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांच्या पुतळ्याचे अनावरण
चिपळूण : येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरात भारतरत्न डॉ. पां. वा. काणे यांच्या जन्मदिनी त्यांच्या पुतळ्याचे अनावरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व प्रशासक प्रसाद शिंगटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रसाद शिंगटे यांनी कोंकणातील प्रतिभावंतानी आपल्या ज्ञानाने देशाला प्रगतीपथावर नेले आहे. लोटिस्माने उभारलेल्या कलादालनात असलेली तैलचित्रे या महापुरुषांच्या कार्याची भावी पिढीला प्रेरणा देणारी आहेत. चिपळूण परिसरात मोठा इतिहास घडला. याची ओळख करून देणारी ध्वनिचित्रफीत करायला हवी आहे. आपण यासाठी प्रयत्न करुया. भारतरत्न डॉ पां. वा. काणे यांच्या पुतळ्याचे अनावरण आणि पुष्पहार अर्पण करण्याची संधी मिळाली याबद्दल संस्थेच्या संचालकांना शिंगटे यांनी धन्यवाद दिले. चिपळूण नगरपरिषदेचे अशा चांगल्या कामाला नक्कीच सहकार्य असेल असेही ते शेवटी म्हणाले.
प्रकाश काणे म्हणाले, माझ्या भाग्याने मला लहानपणी भारतरत्न काणे यांना पदवंदन करता आले. पां. वा. काणे यांचा जन्म चिपळूण जवळच असलेल्या परशुराम क्षेत्री झाला. चिपळूण आणि परशुराम अगदी जवळ आहे. त्यामुळे चिपळूणला त्यांचे एखादे स्मारक करायला हवे. चिपळूण नगरपरिषदेच्या सहकार्याने करता येईल, असे सांगून काणे यांनी नगरपरिषद यासाठी सहकार्य करेल असा विश्वास व्यक्त केला. काणे यांनी मुख्याधिकारी यांना यासाठी आवाहन केले.
लोटिस्माचे कार्याध्यक्ष धनंजय चितळे यांनी डॉक्टर काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास लिहिताना प्रकृतीची साथ नसताना मानसिक बळावर ग्रंथ कसा पूर्ण केला आणि डॉक्टर काणे यांच्या ह्या धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथातील उतारा त्यांनी वाचून दाखविला. असे महामानव आपल्या कोंकणात जन्माला आले याचा अभिमान वाटतो असे ते म्हणाले.
ज्येष्ठ इतिहास अभ्यासक प्रकाश देशपांडे यांनी, डॉक्टर काणे यांची धर्मशास्त्राचा इतिहास लिहिण्यामागची राष्ट्रीय अभिमानाची भूमिका विशद केली.
लोटिस्माचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी अध्यक्षीय भाषणात चिपळूण शहरातील लोटिस्माचे महत्व समजून घेऊन संपूर्ण सहकार्य करणारे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या हस्ते डॉक्टर काणे यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले याचा आनंद व्यक्त केला.
अरुण इंगवले यांनी आभार मानताना हा पुतळा साकारणारे संदीप ताम्हणकर यांच्या कलेचा आवर्जून उल्लेख केला.
या कार्यक्रमाला मसापचे चिपळूण शाखा अध्यक्ष प्रा. संतोष गोनबरे, चिपळूण कोमसापचे उपाध्यक्ष कवी राष्ट्रपाल सावंत, माजी नगरसेविका सौ.-माधुरी पोटे, उपाध्यक्ष सुनील खेडकर, सुधीर पोटे, कार्यवाह विनायक ओक , संचालक मधुसूदन केतकर, प्रकाश घायाळकर संस्थेचे संचालक अभिजित देशमाने, संजय शिंदे, श्रीराम दांडेकर, सुमेध करमरकर आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com