साखरपा : मानेभोवती दोरी व दोन्ही हात बांधलेल्या स्थितीत आंबा घाटातील खोल दरीत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला. यापूर्वीही रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटात असे प्रकार उघडकीस आले आहेत. आताही घातपाताची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आंबा घाटात 150 फूट खोल दरीत अज्ञात पुरूषाचा मृतदेह असल्याची खबर देवरूख पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक बाळकृष्ण जाधव आपल्या सहकार्यांसमवेत घटनास्थळी पोहोचले. यावेळी मृतदेह दरीतून बाहेर काढण्यासाठी राजू काकडे हेल्प अॅकॅडमीच्या टीमला पाचारण करण्यात आले. यानुसार अॅकॅडमीचे अण्णा बेर्डे, दिलीप गुरव, चंद्रकांत भोसले, प्रवीण परकर यांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह दुपारनंतर दरीतून बाहेर काढला. या अज्ञात पुरूषाचे वय अंदाजे 25 ते 30 असून त्याचा घातपात करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत.