सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत महोत्सव ,१४ उत्कृष्ट चित्रपट पाहण्याची रसिकांना संधी
चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देशाने पहिला कोकण चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.येत्या 9 ते 14 मे दरम्यान सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत महोत्सव रंगणार आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, अलका कुबल, विजय राणे, छाया कदम, प्रमोद मोहिते, अमीर हडकर, प्रकाश जाधव, यश सुर्वे आदींनी एकत्र येत ‘सिंधुरत्न कलावंत मंच’ या संस्थेची स्थापना केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून कोकण चित्रपट महोत्सव भरवण्यात येत आहे. या महोत्सवाची रूपरेषा व नामांकन प्राप्त चित्रपट व विजेत्यांच्या नावांची घोषणा नुकतीच करण्यात आली.
चित्रपटसृष्टीत मोलाचे योगदान देणाऱया दिग्गज कलावंतांचा या महोत्सवात सन्मान केला जाणार आहे . अशोक सराफ, किशोरी शहाणे, मोहन जोशी, पद्मिनी कोल्हापुरे यांचा विशेष पुरस्काराने सन्मान होणार आहे.
उत्कृष्ट 14 चित्रपट
जीवनसंध्या, फनरल, कानभट, भारत माझा देश आहे, 8 दोन 75, पल्याड, हिरकणी, प्रितम, प्रवास, मी पण सचिन, सिनियर सिटीझन, रिवणावायली, फिरस्त्या, शहिद भाई कोतवाल
सिंधुदुर्ग जिह्यात कोकण चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ 9 मे रोजी सायंकाळी 5 वाजता होईल. सिंधुदुर्ग जिह्यातील कणकवली, देवगड, वैभववाडी, कुडाळ, मालवण, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या 8 तालुक्यांत 4 दिवस दुसऱया फेरीसाठी निवड करण्यात आलेले 14 चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखविले जातील. 12 मे रोजी वेंगुर्ले येथे परिसंवाद आयोजित करण्यात आले आहेत. महोत्सवाचा पारितोषिक वितरण समारंभ सिंधुदुर्गात मामा वरेरकर नाटय़गृहात 14 मे रोजी सायंकाळी 5 वाजता होईल.
रत्नागिरी येथील चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ 9 मे रोजी सकाळी 11 वाजता वीर सावरकर नाटय़गृह, रत्नागिरी येथे होईल. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण कॅबिनेट मंत्री उदय सामंत या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी जिह्यातील रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली येथे सलग 4 दिवस रोज तीन चित्रपट प्रेक्षकांना विनामूल्य दाखविले जाणार आहेत.
www.konkantoday.com