ओणी-पाचल अणुस्कुराच्या कामासाठी पाचलच्या जनतेचे आंदोलन
राजापूर : ओणी-पाचल अणुस्कुरा रस्ता दुरूस्तीच्या कामात शासन-प्रशासन आणि लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या पाचल परिसरातील जनतेने पाचल ग्रामपंचायतीच्या नेतृत्वाखाली रविवारी पाचल येथे धरणे आंदोलन छेडले. या आंदोलनाला जनतेचा चांगला प्रतिसाद लाभला. पाचल परिसरातील शेकडो ग्रामस्थ महिला या आंदोलनात सहभागी झाले होते. या जनआंदोलनाची दखल घेऊन प्रशानाने आणि लोकप्रतिनिधींनी या रस्त्याचे काम तातडीने सुरू केले नाही तर आम्हाला जेलभरोसारखे आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा पाचलचे माजी सरपंच अशोक सके यांनी यांनी आंदोलनात बोलताना दिला.
गत पावसाळ्यात पूर्ण खराब झालेल्या ओणी-पाचल- अणुस्कुरा रस्त्यासाठी सुमारे 7 कोटी 44 लाख रूपये शासनाने मंजूर केले, पण कामाची निविदा म्हणजेच वर्क ऑर्डर देणे आणि कामाला सुरूवात करणे यामध्ये झालेल्या दिरंगाईमुळे या रस्त्याचे काम रखडले आहे. पावसाळा पंधरा दिवसांवर येऊन ठेपला तरी काम सुरू होण्याचे कोणतेच चिन्ह दिसत नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या जनतेने धरणे आंदोलन करून शासनाचे याकडे लक्ष वेधले. पाचलचे उपसरपंच किशोर नारकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला बांधकाम विभागाचे उपअभियंता दुधाडे यांनी भेट देऊन सोमवार दि. 2 मे 2022 पासून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करत असल्याचे आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले. त्यामुळे धरणे आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचे सर्वपक्षीय आंदोलनकर्त्यांनी सांगितले.