नगर पंचायत भाजपची! तरीही आ. निकमांकडून देवरूखच्या विकासासाठी दोन वर्षात 6 कोटी 50 लाखांचा निधी

चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी देवरूख शहर विकासासाठी आणखीन 1 कोटी 30 लाख रुपयांचा निधी देऊ केला आहे.  यामुळे आजवर आमदार निकम यांच्याकडून दोन वर्षात 6 कोटी 50 लाख रुपयांचा भरघोस निधी दिला आहे. निधी देण्यात आमदार यांनी कोणतेही राजकारण न आणता निधी दिल्याची माहिती राष्ट्रवादी देवरूख शहर अध्यक्ष हनिफ हरचिरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. या निधीमुळे देवरूख शहराचा विकासात्मक कायापालट होणार आहे. या निधीत सोळजाई देवी मंदिरासाठी 35 लाख, तर मशिदीसाठी 7 लाख रुपयांचा निधी दिला आहे. याचबरोबर देवरूखमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरणासाठी 15 लाख रुपये निधी देऊन सर्व समाजासाठी काम केले आहे. देवरूख नगर पंचायतीवर भाजपची सत्ता असतानाही देवरुखच्या विकासासाठी आमदार निकम यांनी कोट्यवधी रुपयांचा निधी देऊ केला आहे. देवरूखला अग्निशमन बंब मंजुरीसाठीही आमदारांनी विशेष प्रयत्न केले आहेत. नगर पंचायत नूतन इमारतीसाठीही वाढीव निधी आमदार यांनी निधी दिला. गेली अनेक वर्ष बसस्थानकाचे काम रखडले आहे. दोन दिशा मार्ग आराखड्यात असताना एकदिशा मार्ग सुरु आहे. गाळेधारकांना जायला यायला साधा सरळ मार्गही नाही. या प्रश्नाकडे लक्ष वेधून प्रश्न मार्गी लावण्यासाठी आमदारांकडे मागणी करणार असल्याचे हरचिरकर यांनी सांगितले. देवरुख शहरासाठी आणखी लागेल तसा निधी मिळवून देऊ, असे आमदार निकम यांनी  आश्‍वासन दिल्याचे हरचिरकर यांनी सांगितलेे. पत्रकार परिषदेला गुरुप्रसाद  सावंत, बापू गांधी, बाळू ढवळे, प्रफ्फुल भुवड, पंकज पुसाळकर, नीलेश भुवड, वाय. जी. पवार,  बी. पी. पवार, चंद्रकांत जाधव, कृष्णा कदम, चंदन कदम, संजय मोहिते, सुहास मोहिते, राजू मोहिते,  कांबळे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button