
जिल्ह्यात प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू
रत्नागिरी दि. 28 – रत्नागिरी जिल्ह्यात ठिकठिकाणी सामाजिक व वैयक्तिक कारणांसाठी, मागण्यांसाठी
विविध आंदोलने होत असून 01 मे 2022 रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी
आंदोलनात्मक कार्यक्रम होणार आहेत. तसेच दि. 03 मे 2022रोजी मुस्लिम धर्मियांचा रमजान ईद
सण आणि हिंदु धर्मियांचा अक्षय तृतीया हे सण एकाच दिवशी साजरे होणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 03 मे 2022 रोजी पर्यंत मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्यात येईल असा राज्य शासनाला इशारा दिलेला आहे.त्यामुळे मशिदीवरील भोग्यांवरुन आगामी काळात वाद विवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच राज्यात विविध ठिकाणी सांप्रदायिक घटना घडत असून त्याचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. वरील सर्व परिस्थिती लक्षात घेता रत्नागिरी जिल्हयात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन घडलेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व परिस्थिती लक्षात घेता, रत्नागिरी जिल्हयात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरुन झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) अन्वये मनाई आदेश जारी करणे आवश्यक आहे व त्याबाबत खात्री झाली आहे. अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 ( 1 ) ( 3 ) नुसार 29 एप्रिल 2022 रोजी 00.01 वा. पासून ते 13 मे 2022 रोजी 24.00 वा. पर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करत आहे. या आदेशान्वये वरील कालावधीत पुढील कृत्य करण्यास मनाई करण्यात येत आहे. शारीरीक दूखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदूका, सूरे, लाठया अगर कोणतीही वस्तू घेवून फिरणे. अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेवून फिरणे. दगड किंवा इतर शस्त्रे हत्यारे किंवा शस्त्र फेकावयाची साधने बरोबर घेवून फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे. सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. सार्वजनिक रितीनी घोषणा करणे, गाणी गाणे, वादय वाजविणे. पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांना विना परवानगी एकत्रित येण्यास मनाई आहे. आवेशी भाषण, अंगविक्षेप विडंबनपर नकला करणे, सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा किंवा ज्यामुळे जिल्हयाची सुरक्षितता धोक्यात येईल. उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश हे पुढील बाबींकरिता लागू होणार नाहीत. अंत्ययात्रा., धार्मिक विधी, लग्न सोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम इत्यादी. शासकीय सेवेत तैनात कर्मचारी. सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच इत्यादी. प्रतिबंधात्मक आदेशाचे काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा, निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे व अशी परवानगी घेतल्यानंतरच उपरोक्त प्रतिबंधात्मक आदेश लागू होणार नाही,असेही आदेशात म्हटले आहे.