कोकणातील पहिला झिप लाईन प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील आरेवारे या प्रसिद्ध पर्यटनस्थळी
निळाशार समुद्राच्या लाटांचे विहंगम दृश्य ७० फूट उंचावरून पाहण्याचा निर्भेळ आनंद पर्यटकांना मिळावा यासाठी कोकणातील पहिला झिप लाईन प्रकल्प रत्नागिरी तालुक्यातील आरेवारे या प्रसिद्ध पर्यटनस्थळी साकारण्यात आला आहे. रत्नदुर्ग माऊंटेनिअरिंगच्या सदस्यांनी यासाठी पुढाकार घेतला असून त्याची यशस्वी चाचणी नुकतीच घेण्यात आली. १४०० फूट लांबीच्या अंतरावर झिपलाईनला लटकत अवकाशातून विहार करत जाण्याचा अनुभव घेण्याची संधी या निमित्ताने मिळणार असून, कोकणातील हा पहिलाच प्रयोग आहे.
प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिराकडे जाणार्या मार्गावर आरेवारे खाडी आणि किनार्यावरील डोंगरावरील पर्यटन स्पॉट पर्यटकांच्या पसंतीस पडलेला आहे. हंगामामध्ये हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देतात. याच ठिकाणी खाडीच्या किनार्यापासून डोेंगरावर १४०० फूट लांबीचा रोप बांधण्यात आला आहे. किनार्यापासून ७० फूट उंचीवर हा रोप राहिल, अशी तजवीज केली आहे. आकाशामध्ये लटकत समुद्राच्या लाटांसह निसर्गाचा निर्भेळ आनंद लुटण्याची संधी या झिपलाईनमुळे पर्यटकांना मिळणार आहे. www.konkantoday.com