मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय कौतुक करण्यासाठी फायर आजीच्या घरी

0
131

शनिवारी तळपत्या उन्हात हजारो शिवसैनिकांनी राणा दांपत्याच्या विरोधात प्रखर आंदोलन केले.मातोश्री’बाहेर शेकडो शिवसैनिक जमा झाले होते. त्यात चंद्रभागा आजीही होत्या. एखाद्या तरुणालाही लाजवेल असा उत्साह, चैतन्य अंगी असलेल्या आजी अवघ्या महाराष्ट्रात प्रसिद्ध झाल्या त्या ‘फायर आजी’ म्हणूनच. उद्धव ठाकरे यांनी आजींना लगेच ‘मातोश्री’वर बोलावणे धाडले आणि त्यांचे कौतुक केले. शिंदे आजी एका दिवसात अवघ्या महाराष्ट्राच्या ‘फायर आजी’ झाल्या!
याच फायर आजींची त्यांच्या घरी भेट घेण्यासाठी पक्षप्रमुख- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे काल सायंकाळी भोईवाडा येथे गेले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी शेकडो शिवसैनिक उपस्थित होते. ‘एसआरए’च्या बिल्डिंगमधील छोटय़ाशा खोलीत पक्षप्रमुख-मुख्यमंत्री सहकुटुंब येणार हे समजल्यापासून शिंदे कुटुंबातच नव्हे, तर अख्ख्या इमारतीत उत्साहाचे वातावरण होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सहकुटुंब आगमन होताच त्यांचे औक्षण करण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी ओवाळणी दिली आणि चौघांनीही घराबाहेर चप्पल काढून आत प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी आजींचा आशीर्वाद घेतला तर सौ. रश्मी ठाकरे यांनी आजींची गळाभेटच घेतली. तुम्हीच आमच्या घरी यायचे म्हटलं आपणही तुमच्या घरी जाऊ. म्हणून आलो, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आजींचा हात हातात घेतला आणि संवाद साधला. मुख्यमंत्री असले तरी कोणताही बडेजाव नव्हता. ठाकरे कुटुंबांच्या या साधेपणामुळे सर्वचजण भारावले होते. मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना शिंदे आजी म्हणाल्या, साहेब, मुंबईत पुन्हा शिवसेनेशिवाय कोणीच येणार नाही. आम्ही आहोत तुमच्यासोबत.
या कौटुंबिक संवादानंतर ठाकरे कुटुंबीय निघाले. जाताना त्यांनी खास आणलेल्या आंब्याच्या पेटय़ा आजींना भेट म्हणून दिल्या. इमारतीखाली येताच तेथे उपस्थित असलेल्या महिला शिवसैनिकांनी सोबत छायाचित्र काढण्याची विनंती उद्धव ठाकरे यांना केली. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी त्यांचीही विनंती मान्य केली आणि मग मुख्यमंत्र्यांचा ताफा ‘मातोश्री’च्या दिशेने रवाना झाला…
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here