‘राज्य उत्पादन शुल्क’कडून वर्षभरात 4 कोटींचा मुद्देमाल जप्त; 818 आरोपींना अटक

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्क विभागाने सन 2021-22 मध्ये केलेल्या कारवायांमध्ये 1 हजार 319 गुन्ह्यांमध्ये 818 आरोपींना अटक करण्यात आली. या कारवायांमध्ये 4 कोटी 3 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापुढेही अशा कारवाया वाढणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक धोमकर यांनी सांगितले. कोरोना काळातील बंधने संपुष्टात आली तरी रत्नागिरी जिल्ह्यातील शासन मान्य मद्य दुकानांमधील विक्री म्हणावी तशी वाढलेली नाही. चालू वर्षात सुमारे 76 लाख बल्क लीटर मद्य विक्री झाली. हीच विक्री कोरोना काळातील सन 2020-21 मध्ये सुमारे 85 लाख बल्क लीटर इतकी होती. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागाला अवैध दारू विक्रीवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील 59 देशी बार, 135 बियर शॉपी आणि 9 वाईन शॉप व 220 परमीट रूममधील विदेशी मद्याच्या विक्रीची राज्य उत्पादन शुल्ककडे नोंदणी होत असते. ही मद्यविक्री जशी वाढेल तसा शासनाचा महसूल वाढत असतो. अवैध मद्यविक्रीमुळे शासनमान्य मद्यविक्री दुकानातील ग्राहक कमी होतो. परिणामी मद्यविक्री घटते. ही मद्यविक्री का घटते, याचा शोध घेऊन त्यावर राज्य उत्पादन शुल्ककडून कारवाई केली जाते.  रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना काळातील सन 2020-21 मध्ये 22 लाख 75 हजार लाख बल्क लीटर देशी दारूची विक्री झाली. तीच विक्री कोरोना काळातील मद्यविक्रीवरील बंधने उठूनही सन 2021-22 मध्ये कमी होऊन 17 लाख 68 हजार बल्क लीटर इतकी झाली आहे. विदेशी मद्याची सन 2020-21 मध्ये 24 लाख 31 हजार बल्क लीटर तर सन 2021-22 मध्ये विदेशी मद्याची विक्री 24 लाख 65 हजार बल्क लीटर इतकी आहे. सन 2020-21 मध्ये कोरोना काळातही 39 लाख 6 हजार बल्क लीटर इतकी बियर विकली गेली. तीच विक्री कोरोना बंधने उठल्यानंतरही सन 2021-22 मध्ये कमी होऊन 35 लाख 16 हजार बल्क लीटर इतकी झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button