ग्रंथोत्सव साजरा करण्याचा दिवस म्हणजे जागतिक पुस्तक दिन.

0
176


हे डिजीटल युग आहे, सगळेच संदर्भ त्यानुसार बदललेत. ग्रंथांची मैत्री नसणारी व्यक्तीही भरभरून ग्रंथ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा प्रसारित करून आपले कर्तव्य बजावते. या डिजिटल युगामुळे ग्रंथ दिनाचा प्रचार व प्रसार झाला ही सकारात्मक बाजू…!
डिजिटल युग हे ग्रँथचळवळी समोरच आव्हान तर नाही ना
या डिजिटल क्रांतीमुळे पुस्तकापासून वाचक दूर जाऊ लागला हे आव्हान ग्रंथसंपदा कसे पेलते हे पाहण्यासारखे आहे.
ग्रंथ हा माणसाचा मित्र! ग्रंथवाचन व्यक्तिमत्व प्रभावी बनवते, ग्रंथ वाचताना टिपलेले ज्ञानकण निव्वळ समृद्ध करतात याची प्रचिती सर्व उत्तम वाचक नित्यनैमित्तिक घेत असतो. मात्र ‘अलीकडच्या धकाधकीच्या जीवनात त्यातही डिजिटलच्या आकर्षक युगात ग्रंथांत बद्दलची आपुलकी कमी होत आहे का..!?’ असा प्रश्न मी स्वतःला विचारला. हा प्रश्न माझ्यासारख्या रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाच्या अध्यक्षाला होता. आणि हा प्रश्न उभा राहताच वाचनालयाची ओतप्रोत भरलेली ग्रंथसंपदा नजरेत तरळून गेली. मी वाचनालयाच्या सर्व पुस्तकांच्या कपाटासमोर पुस्तक न्याहाळत गेलो आणि रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयात असलेल्या ग्रंथ वैभवाकडे माझे लक्ष स्थिरावले.
दुर्मिळ ग्रंथांनी सजलेला खजिना
1 लाख 9 हजारांची ग्रंथसंपदा, 1800 च्या शतकातील 57 ग्रंथ 1900 ते 1950 पर्यंत 165 ग्रंथ हे या अवनीवर अत्यंत दुर्मिळ ठरावेत असे ग्रंथ आपल्या वाचनालयाचे ग्रंथवैभव समृद्ध करत आहेत..!! मी सर्व वाचकांना आवाहन करतो की या ग्रंथदिनी हा संकल्प करूया… हे जुने वैभव आपल्या वाचनात आणूया… वाचनालयाचे दाखल क्रमांक 29 ते 6515 या क्रमांकांवरती हा ग्रंथ खजिना तुमची वाट पाहत आहे. जुन्या ग्रंथ संपदेचा धांडोळा घेत असताना आणखी तेजस्वी खजिना नजरेस पडला…
वैविध्यपूर्ण साहित्य
त्यामध्ये 21000 कादंबऱ्या, 14500 कथा, 3500 चरित्र, 2800 काव्यसंग्रह, 3800 निबंध, 6000 बालविभाग, तब्बल 3800 नाटकांची पुस्तके, 500 अर्थशास्त्राची पुस्तके, 1200 प्रवासवर्णने, 250 भाषणे, 680 टीका/समीक्षा, 1300 ज्योतिषशास्त्राची पुस्तके, 40 संस्कृत पुस्तके, इतिहास विषयावरील 2100पुस्तके, 600 कोश असे जवळजवळ 40 साहित्यिक प्रकारची पुस्तके वाचकांच्या मनस्पर्शाची वाट पाहत आहेत. जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून हे ग्रंथ वाचकांना साद घालत आहेत. ती साद वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी हा प्रपंच..!!
ज्ञानपीठ प्राप्त सारस्वतकारांचे साहित्य
या ग्रंथ दिनी पुस्तकांच्या समीप गेलो असता चार ‘ज्ञानपीठ’ विजेत्या सारस्वतांच्या तब्बल 217 साहित्यकृती वाचनालयात उपलब्ध आहेत ही रोचक माहिती संकलित झाली. वि. स. खांडेकर यांची 138 पुस्तके- त्यामध्ये ययाती कांचनमृग, उल्का, दोन ध्रुव, सुखाचा शोध.. अशी अत्यंत लोकप्रिय हरवलेली साहित्यकृती आहेत. दुसरे ज्ञानपीठ विजेते कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांची 46 पुस्तके – त्यामध्ये विशाखा, हिमरेषा, जीवनलहरी, समिधा, छंदोमयी, रसयात्रा, मेघदूत, स्वगत इत्यादी साहित्यकृती अंतर्भूत आहेत. विंदा करंदीकर या ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त सारस्वतांची 21 पुस्तके स्वेदगंगा, मृदगंध, ध्रुपदद, राणीचा बाग, परी ग परी, अमृतानुभव अशा साहित्यकृतींचा अंतर्भाव आहे. भालचंद्र नेमाडे यांची 12 पुस्तके वाचनालयाच्या ग्रंथ कपाटांची शोभा वाढवत आहेत. त्यामध्ये हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ, कोसला , हुल इत्यादी साहित्यकृती समाविष्ट आहेत ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त व्यक्तींनी आपल्या ओजस्वी ,स्पष्ट साहित्यिक लिखाणाने समृद्ध केलेल्या साहित्यकृती प्रत्येक सुज्ञ नागरिकांनी वाचल्या पाहिजेत, नव्हे ग्रंथोत्सव साजरा करण्याचा संकल्प करतानाच या ग्रंथांची निवड करत ते वाचून आपले व्यक्तिमत्त्व प्रभावी करण्यासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे.
मौल्यवान साहित्यकृती
पुढे सरकताना अनेक प्रसिद्ध ग्रंथांचे दर्शन घेतले. मृत्युंजय, ययाति कोसला, श्यामची आई, व्यक्ती आणि वल्ली, रानवाटा या बरोबरच विशाखा, जिप्सी, फुलराणी, रसयात्रा हे कवितासंग्रह समोर आले. पुढे झीम्मा, कर्हेचे पाणी, मन मे है विश्वास ही चरित्र मला खिळवून राहिली. ग्रीकांजली ,अपूर्वाई, भटकंती, नर्मदे हर हर ही प्रवासवर्णने खुणावत राहिली. राऊ अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर, पानिपत, पावनखिंड, इतिहासाची सहा सोनेरी पाने ही इतिहासातील ग्रंथसंपदा वीररसाला आमंत्रित करत उभी असलेली लक्षात आली.
स्थानिक साहित्यिकान चे साहित्य
पुढे सरकताना स्थानिक लेखकांच्या काही ग्रंथ कृतींनी मला थबकायला लावले. कै.आमदार कुसुमताई अभ्यंकर, कै.स्मिताताई राजवाडे, कै.प्र. ल. मयेकर, अभिजीत हेगशेट्ये, ऍड. विलास पाटणे अशा अनेक स्थानिक लेखकांच्या साहित्यकृती ‘हे वाचायलाच पाहिजे’ अशा आहेत.
वाचकांना भावलेलि पुस्तक
आजच्या जागतिक ग्रंथदिनी सर्वात जास्त वाचलेली दहा पुस्तके कोणती ते तपासले आणि मन आनंदले. गोंदण, शोध, व्यक्ती आणि वल्ली, मन मे है विश्वास, नागकेशर, द लास्ट गर्ल, एक होता कार्व्हर, गोष्टी माणसांच्या ही 10 पुस्तके वाचकांच्या पसंतीस सर्वाधिक उतरलेली दिसली. वाचनालयाच्या ग्रंथ संपदेत पु. ल. देशपांडे, व. पु. काळे , दुर्गा भागवत, वि. वा. शिरवाडकर, कुसुमताई अभ्यंकर, सुधा मूर्ती, सुमती क्षेत्रमाडे, इरावती कर्वे, सुहास शिरवळकर, रत्नाकर मतकरी, नारायण धारप, विजया वाड, अच्युत गोडबोले इत्यादी नामवंत लेखकांनी वाचनालयाची ग्रंथसंपदा समृद्ध केली आहे.
सभासद वाचक होण्यासाठी साद
तर या जागतिक ग्रंथदिनी रत्नागिरीतील आपल्या सांस्कृतिक परंपरेच्या या सरस्वती मंदिरात ग्रंथांच्या भेटीसाठी आपण जरूर यावे. 200 वर्षाकडे अग्रेसर होणारे हे ग्रंथालय , 1 लाख 9 हजार पुस्तकांनी समृद्ध असलेले हे वाचनालय सर्व वाचकांना या वाचनालयात येऊन ग्रंथांशी मैत्री करण्यासाठी साद घालत आहे. जागतिक ग्रंथदिनीआपण सर्वांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाचे वाचक सभासद होण्याचा संकल्प करूया..!!


अँड.दीपक पटवर्धन
अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय रत्नागिरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here