रत्नदुर्ग किल्ल्याची स्वच्छता करून दरवाजाला बांधले तोरण
रत्नागिरी : रत्नदूर्ग किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार वेली, झाडेझुडपे यांनी वेढलेले होते. त्यामुळे किल्ल्याच्या अनेक खुणाही त्यातून दिसून येत नव्हत्या. गेल्या काही दिवसांपासून पर्यटकांची पावले मोठ्या संख्येने किल्ल्याकडे वळत असल्याने, किल्ल्याची अवस्था पाहून नाराजी व्यक्त केली जात होती. हा प्रकार रत्नागिरीतील गडकिल्ले प्रेमींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी किल्ल्याचे प्रवेशद्वार श्रमदानातून स्वच्छ केले.
सुभेदार मायनाक भंडारी स्मारक समिती आयोजित आणि गडकिल्ले अभ्यासक महेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, सर्व शिवप्रेमी संघटनांनी एकत्र येत एक दिवसाची स्वच्छता मोहीम रत्नदुर्ग येथे आयोजित केली. यावेळी स्वच्छता करण्यात आली. श्रमदानावेळी सुभेदार मायनाक भंडारी स्मारक समिती, शिवप्रतिष्ठान, सह्याद्री प्रतिष्ठान, हनुमान मंडळ किल्ला या दुर्गप्रेमी संस्थांचे प्रसाद घोडगे, राकेश नलावडे, नंदकुमार साळवी, अॅड. अमित काटे, नितीन भोंडवे, गोवर्धन राठोड, सागर मोहित, प्रफुल्ल कदम, अनिकेत सुर्वे, प्रसन्न यादव, यश डोंगरे, सौरभ सुर्वे आदी शिवप्रेमी तरूण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. श्रमदान मोहिमेसाठी व्यावसायिक गणेश धुरी यांनी सहकार्य केले. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाला तोरणं लावून श्रमदान मोहिमेची सांगता करण्यात आली. या समितीमार्फत येत्या काही दिवसात स्थलदर्शक नकाशा, गडाचा संक्षिप्त इतिहास आणि मार्गदर्शक फलक लावण्याचे नियोजित आहे.