काजू बोंडे, मोह फुलांच्या दारूला आता विदेशी मद्याचा दर्जा
रत्नागिरी : काजू बोंडे आणि मोह फुलांपासून बनविलेल्या दारूला आता देशीऐवजी विदेशी मद्य, अशी मान्यता देण्यात आली आहे. याबाबतच्या धोरणास बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
काजू बोंडे, मोह फुले यासह स्थानिकरित्या उपलब्ध होणारे फळे-फुले यापासून तयार होणार्या मद्यार्कापासून पेय, मद्यनिर्मिती होईल. यामुळे नैसर्गिक आपत्तीमध्ये वाया जाणार्या व नाशिवंत अशा उत्पादनांचा वापर होऊन, त्यांची मूल्यवृद्धी होईल. याचा फळे, फुले उत्पादकांना लाभ होणार आहे. याशिवाय, एक स्वतंत्र उद्योग निर्माण होऊन राज्यात रोजगारनिर्मितीबरोबरच महसुलात वाढ अपेक्षित आहे.
काजू बोंडे व मोह फुलांच्या मद्यार्कापासून बनविण्यात येणार्या मद्याचे वर्गीकरण हे 2005 पासून देशी मद्य असे करण्यात आले होते. या वर्गीकरणामुळे या मद्याचे मार्केटिंग व मूल्यवृद्धीस मर्यादा येत होत्या. त्यामुळे काजू बोंडे, मोह फुले या पदार्थांसह स्थानिकरित्या उत्पादित होणार्या फळे, फुले यापासून तयार होणार्या मद्यार्कापासून जे मद्य तयार केले जाईल, त्यास देशीऐवजी ‘विदेशी मद्य’ असा दर्जा देण्यास मान्यता देण्यात येत आहे.
स्थानिक फळे, फुले इत्यादीपासून मद्यार्क उत्पादनाकरिता परवाना देण्यास मान्यता देण्यात आली. फळे, फुलांच्या उपलब्धतेनुसार कमी मद्यार्क उत्पादित झाल्यास अशा परिस्थितीत अथवा गरजेनुसार एखाद्या फळा-फुलापासून उत्पादित मद्यार्काचे दुसर्या फळा-फुलांपासून उत्पादित मद्यार्कामध्ये मिश्रण करण्यास मुभा राहणार आहे. फळे, फुले यापासून तयार होणार्या मद्यार्कापासून उत्पादित होणार्या मद्यावरील उत्पादन शुल्काचा दर सवलतीचा राहील.