दापोलीत महसूल विभागाने जप्त केलेली क्रेन गेली चोरीला

0
83

दापोली : तालुक्यातील पांगारी खाडीकिनारी बेकायदेशीर वाळू उपसा करण्याच्या उद्देशाने ठेवलेली क्रेन मशिनरी दापोली महसूल विभागाच्या पथकाने 2020 साली जप्त करून सील केली होती. मात्र, जप्त केलेली ही क्रेन मशिनरी दोन दिवसांपूर्वी रातोरात चोरीला गेल्याची घटना उघड झाली आहे. याला दापोली महसूल विभागाने देखील दुजोरा दिला आहे.
सुमारे 15 लाख किमतीची ही क्रेन मशिनरी होती, असा अंदाज वर्तविला जात आहे. ज्या वर्षी ही क्रेन मशिनरी सील करण्यात आली. त्यानंतर ती क्रेन दापोली महसूल विभाग कधी ताब्यात घेणार? आणि दापोलीत कधी आणणार? अशी विचारणा त्या वेळेस दापोली तहसीलदार वैशाली पाटील यांना पत्रकारांनी  केली होती. तर एखाद्या गाडीची व्यवस्था झाली की ती क्रेन दापोलीत आणली जाईल, असे तहसीलदार यांनी सांगितले होते. मात्र, दोन वर्ष दापोली महसूल विभागाला ती क्रेन ताब्यात घेण्यास वेळ मिळाला नाही आणि शेवटी ती क्रेन चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. पांगारी या ठिकाणी बेकायदेशीर वाळू उपसा होत आहे, अशा तक्रारी महसूल विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार  येथील देगाव मंडल अधिकारी सुधीर पार्दूले यांनी  दि. 1 नोव्हेंबर 2021 रोजी येथे पंचनामा करून वाळू साठा आणि सील तोडलेली उभी क्रेन, अशी पंचयादी घातली होती. मात्र, ही क्रेन चोरीला गेल्याने दापोली महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here