पाटपन्हाळे येथे भर वस्तीतून नेली 33 के. व्ही. ची विद्युत वाहिनी
गुहागर : पाटपन्हाळे कोंडवाडी येथे भर वस्तीतून 33 के. व्ही. लाईन गेली आहे. या लाईनमुळे धोका असल्याने कोंडवाडीतील ग्रामस्थांनी जंगल भागातून आपल्या जमिनीतून नेण्यासाठी सांगितले. तरीही त्यांचे म्हणणे समजून घेण्यात आले नाही, असा आरोप स्थानिक शेतकर्यांनी केला आहे. गुहागरकडे जाणारी 33 के. व्ही. लाईन ही शृंगारतळी ते गुहागर या मार्गाने न जाता ही लाईन शृंगारतळी मार्गे पालपेणे, पाटपन्हाळे कोंडवाडीतून गुहागर – विजापूर या मार्गावरील पाटपन्हाळे साळवी स्टॉप येथे बाहेर काढून ती गुहागरकडे नेण्यात आली आहे. या लाईनखालील झाडे अर्धवट तोडून ती शेतकर्यांच्या शेतात टाकली आहेत. त्यामुळे येथील शेतकर्यांनी संताप व्यक्त केला आहे. ही 33 के. व्ही. ची लाईन वस्तीतून गेल्यामुळे जीवाला धोका असल्याने अनेक दिवस या 33 के. व्ही. लाईनला पाटपन्हाळे कोंडवाडीतून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता.