
पोलादपूर एसटी स्थानकात झोपलेल्या आईच्या कुशीतून बाळाची चोरी
पोलादपूर एसटी बस स्थानकात झोपलेल्या महिलेच्या कुशीतून तिच्या बाळाची चोरी अज्ञात व्यक्तीने केल्याने पोलादपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलादपूर पोलीसांनी अज्ञात इसमाविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पोलादपूर एस.टी.बस स्थानकामध्ये सडवली आदिवासीवाडीतील सुमन वसंत कोळी (वय 30 वर्षे)ही भंगारगोळा करून उदरनिर्वाह करणारी महिला युवराज वसंत कोळी या आठ महिने वयाच्या बाळासह झोपली असता अज्ञात इसमाने तिचे बाळ पळवून नेल्याची घटना रविवार, दि. 17 एप्रिल 2022 रोजी रात्री बारा वाजण्यापूर्वी घडली.
या घटनेची फिर्याद आई सुमन कोळी हिने सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास केली. याप्रकरणी अंगात हिरव्या रंगाचा टीशर्ट, कमरेला सप्तरंगी दोरा आणि उंची दीड फूट, वर्ण गोरा अशा वर्णनाचा युवराज वसंत कोळी या मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द भादंवि 363 कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलादपूर पोलीस ठाण्याचे हवालदार संदीप शिरगांवकर हे सहायक पोलीस निरिक्षक प्रशांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करीत आहेत.