गाढवावर बसवून पाटी लावली ‘मी खेडचा भाई’; माजी मंत्री रामदास कदमांच्या बदनामी प्रकरणी राष्ट्रवादीचे माजी आमदार कदम यांना बोरिवली न्यायालयाचे समन्स
खेड : खेड शहरात ३० ऑक्टोबर २०१८ रोजी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी पोलिसांची परवानगी न घेता मोर्चा काढून माझी बदनामी केली होती, या प्रकरणी मी बोरिवली न्यायालयात फौजदारी दावा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयाने संजय कदम यांना दि. २० मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहे, अशी माहिती माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे.
माजी पर्यावरण मंत्री तथा शिवसेना नेते रामदास कदम यांनी माध्यमांना नुकतेच प्रसिद्धीपत्रक दिले आहे. त्यांनी दिलेल्या पत्रात नमूद केल्यानुसार, महागाईच्या विरोधात मोर्चा काढतो, असे भासवून दिनांक ३० ऑक्टोबर २०१८ रोजी राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय कदम यांनी खेड शहरात गाढवावर एका व्यक्तीला बसवून त्याच्या गळयामध्ये ‘मी खेडचा भाई’ अशी पाटी लावली होती. ती व्यक्ती हुबेहूब रामदास कदम दिसेल अशा पद्धतीने त्याची वेशभूषा केली होती . याबाबत मी मा. महानगर दंडाधिकारी १७ वे न्यायालय बोरिवली , मुंबई यांच्याकडे माझा अवमान झाल्याप्रकरणी फौजदारी दाखल केला होता. मोर्च्याच्यावेळी त्यांनी मला उद्देशून माझ्या बदनामीकारक अनेक घोषणा केल्या होत्या. सदर फौजदारी दाव्यात अॅड . शैलेश कंथारिया, अॅड.जयवंत पाटील यांनी न्यायालयामध्ये माझी बाजू मांडून साक्षी पुरावे देखील न्यायालयासमोर सादर केले. याबाबत सर्व बाबींवर विचार करून बोरिवलीच्या न्यायदंडाधीकारी यांनी संजय कदम व सदर बातमी प्रसारित करणाऱ्या एक यूट्यूब चॅनलला आरोपी घोषित केले आहे. त्यांच्या विरोधामध्ये न्यायदंडाधिकारी यांनी समंस पाठविले असून दिनांक २० मे २०२२ रोजी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती रामदास कदम यांनी या पत्रकात दिली आहे. या पत्रासोबत श्री कदम यांनी न्यायदंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाची प्रत माध्यमांना दिली आहे.