हरचिरी, चांदेराई गावांचा पूरप्रश्न लागणार मार्गी; काजळी नदीचा गाळ काढण्यास प्रारंभ
रत्नागिरी : तालुक्यातून वाहणार्या काजळी नदीतील गाळाचा प्रश्न वर्षानुवर्षे गंभीर असून हरचिरी-चांदेराई या गावांना दरवर्षी पुराच्या तडाख्याचा सामना करावा लागत आहे. काजळी नदीतील या दोन गावांच्या हद्दीतील गाळ प्रथमच उपसला जाणार असून यासाठी जिल्हा नियोजनमधून सुमारे 25 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथील ग्रामस्थांची व्यथा जाणून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी गाळ उपशाचा प्रश्न मार्गी लावला आहे.
चांदेराई पूल ते एमआयडीसी धरणापर्यंत गाळामुळे अनेक छोटी बेटे तयार झाली असून त्यात झाडेही वाढली आहेत. या बेटांमुळे नदीचे पात्र अरुंद होत चालले असून काही ठिकाणी विभागलेही गेले आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याच्या प्रवाहाचा तडाखा आजुबाजूला बसत आहे. या नदीतील गाळ उपसावा, यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थांकडून वारंवार मागणी केली जात होती. काजळी नदीला येणार्या पुरामुळे चांदेराई-हरचिरी भागात पुराचे पाणी घुसून बाजारपेठ व शेतीचे नुकसान गेली अनेक वर्ष होत आहे. परंतु या नदीतील गाळ अद्यापपर्यंत उपसण्याला मुहूर्त सापडला नव्हता. आता हा प्रश्न मार्गी लागला आहे.
पाटबंधारे विभागामार्फत हे काम सुरू करण्यात येणार आहे. सुमारे सध्याच्या नदीच्या पातळीत दहा फुटांची खोदाई केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पावसाळ्यापर्यंत जेवढे काम शक्य होणार आहे. तेवढे काम पूर्ण केले जाणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाकडून ड्रेझर मशिन चांदेराई येथे दाखल झाले आहे. या कामाला शनिवारपासून सुरुवात झाली.