
मंगळवारी होणार्या अंगारकी उत्सवाला गणपतीपुळेत ७० हजार भक्तगण दाखल होण्याची शक्यता
राज्य शासनाने आता कोरोनामुळे घातलेले निर्बंध उठविले आहेत त्यामुळे आता देवस्थाने गजबजू लागले आहेत
पहिली अंगारकी संकष्टी मंगळवारी (ता. १९) आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून, उन्हाळी सुट्यांमुळे ७० हजार भक्त गणपतीपुळेत दाखल होण्याची शक्यता आहे.वाहतूक कोंडीसह गैरसोय टाळण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. तहसीलदार, पोलिस, मंदिर देवस्थान आणि ग्रामपंचायतींकडून गणपतीपुळेमध्ये नियोजन केले आहे.
कोरोनातील निर्बंधांमुळे मागील दोन वर्षांतील अंगारकीला भक्तगणांना मनासारखे दर्शन घेता आलेले नव्हते. गतवर्षी गणपतीपुळे मंदिर दर्शनासाठी खुले होते, मात्र किनाऱ्यावर जाण्यास मज्जाव केला होता. अनेक पर्यटक दर्शन घेऊन तसेच माघारी परतले. अपेक्षित अशी गर्दीही झालेली नव्हती. त्यामुळे स्थानिक व्यावसायिकांचा हिरेमोड झाला. यंदा निर्बंध उठलेले असून अनेक शाळांच्या परिक्षाही संपत आलेल्या आहेत. जोडून शासकीय सुट्ट्या आल्यामुळे पर्यटकांचा गणपतीपुळेतील राबता वाढणार आहे. मंगळवारी होणार्या अंगारकी उत्सवाला ७० हजार भक्तगण दाखल होतील, असा अंदाज आहे. त्यानुसार नियोजन करण्यासाठी प्रांताधिकारी डॉ. विकास सुर्यवंशी, तहसीलदार शशिकांत जाधव, जयगड सहाय्यक पोलिस निरीक्षक जे. एच. कळेकर, देवस्थानचे डॉ. विवेक भिडे, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com