चिपळुणात गाळ उपशासाठी आलेल्या डिझेलची चोरी
चिपळूण : शासनाच्या माध्यमातून चिपळूण, खेड, महाड, रत्नागिरी आदी भागातील नद्यांमधील गाळ काढला जात आहे. पाटबंधारे विभागाचे यावर नियंत्रण आहे. मात्र गाळ काढण्यासाठी येणाऱ्या डिझेलची चोरी होत असल्याचा प्रकार चिपळूण तालुक्यात उघड झाला आहे. ना. उदय सामंत हे शुक्रवारी चिपळूण दौऱ्यावर गेले असता त्यांनी या प्रकाराची दखल घेतली. या प्रकरणी पाटबंधारे विभागाची खातेनिहाय चौकशी करा. संबंधित अधिकार्यांनी तत्काळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करावा आणि कारवाई करावी, अशा सूचना ना. सामंत यांनी दिल्या.
चिपळूणमध्ये वाशिष्ठी व शिव नदीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. जलसंपदा विभागाने यासाठी दहा कोटींचा निधी दिला असून विविध यंत्रासाठी डिझेल पुरवठा होत आहे. मात्र येथे डिझेलची चोरी होत असल्याच्या तक्रारी होत होत्या. पाच कामगारांना चोरी करताना पकडले. त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती ना. सामंत यांना देण्यात आली. यावेळी ना. सामंत आक्रमक झाले आणि कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.