
संगीत-नाट्य-कथांमधून व्यक्तीमत्व घडते – डॉ. दिलीप पाखरे
कोमसाप रत्नागिरी युवा शाखेच्या वतीने कथाकथन संपन्नरत्नागिरी, दि.११, प्रतिनिधी : आजकाल कथावाचनापासून आपण दूर चाललो आहोत. कथा, गोष्टी आपण वाचल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी युवा शाखेने कथाकथनाचा स्तुत्य उपक्रम सुरु केला आहे. संगीत, नाट्य आणि कथांमधूनच आपले व्यक्तीमत्व घडत असते. त्यामुळे कथा वाचल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत. भविष्यात तुमच्यातूनच कथा लिहिणारे तयार होतील. कथा लिहिण्यासाठी आपली निरिक्षणशक्ती सक्षम असायला पाहिजे, असे उदगार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.दिलीप पाखरे यांनी काढले. ते आज रा.भा.शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी युवा शाखेच्या कथाकथन कार्यक्रमात बोलत होते.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. दिलीप पाखरे म्हणाले की, कथा लिहिण्यासाठी निरिक्षणशक्ती आणि चौकसपणा आपल्यामध्ये हवा. निरिक्षणातूनच आपण कथा लिहू शकतो. हे सांगताना त्यांनी एक गरीब मुलगी निरिक्षणातून कागदाच्या कपट्यावर आपली निरिक्षणे नोंदवत असते आणि पुढे जाऊन त्याचे पुस्तक होते आणि तिला पारितोषिक मिळते. ही प्रेरणादायी कथा सांगितली, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या रत्नागिरी युवा शाखेने कथाकथनाचा उपक्रम सुरु केला असून आज दुसरे पुष्प गुंफले आहे. या कथाकथनामधून विद्यार्थ्यांमध्ये कथा लिखाणाची आवड निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हा सचिव राजेश गोसावी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आज मोबाईलमुळे काही दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. त्यामुळे आपल्याला कथा ऐकायची सवय नाही. पण आज ऐकलेल्या दोन्ही कथा खूप महत्वाच्या होत्या. या कथा ऐकून आपल्यामध्येही कथा लिहिण्याची सवय निर्माण झाली पाहीजे. तुम्हाला परिक्षेत कथालेखनाचा विषय असतो. त्यासाठी हे कथाकथन खूप फायदेशीर असल्याचे गोसावी यांनी सांगितले. रा. भा. शिर्के प्रशालेच्या पर्यवेक्षिका पुनम पवार यावेळी म्हणाल्या की, सातवी पासून बारावीपर्यंत तुम्हाला मराठी आणि हिंदीच्या पेपरमध्ये कथा लिहीण्याचा प्रश्न असतो. त्यामुळे हे कथाकथन ऐकणे तुम्हाला फायदेशीर ठरेल, असे त्यांनी सांगितले. यावेळी ज्ञानेश्वर पाटील यांनी पाऊल तीचं आणि दुर्गेश आखाडे यांनी अपहरण ही कथा सादर केली. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक दिलीप पाखरे, कोमसापचे जिल्हा सचिव राजेश गोसावी, शिर्के प्रशालेच्या पर्यवेक्षिका पुनम पवार, कवी मेधा कोल्हटकर, उमेश मोहिते उपस्थित होते. उमेश मोहिते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.फोटो कॅप्शन : विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ज्येष्ठ साहित्यिक दिलीप पाखरे