
पुढील वर्षापासून बाबासाहेबांची जयंती भव्य दिव्य साजरी करणार-उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांची मुळगावी घोषणा
रत्नागिरी,दि.14- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंबडवे या मुळगावी दरवर्षी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने साजरी केली जाणारी जयंत्ती आगामी काळात राज्यशासनाच्या माध्यमातून भव्य दिव्य स्वरुपात साजरी केली जाणार असल्याची घोषणा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज आंबडवे येथे केली.
आंबडवे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचेवतीने यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जंयत्तीनिमीत्त आंबडवे येथे आयोजीत करण्यात आलेल्या कार्यक्रमास श्री. सामंत यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लाभली. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे मुळगावी साजऱ्या होत असलेल्या जयंत्तीचे कार्यक्रमास उपस्थित राहण्यास मिळणे हा मी माझा गौरव समजतो, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचारांचा अनुयायी या नात्याने त्यांचे मुळगावाचा सर्वांगीण विकास करणे हे माझे नैतिक कर्तव्य मानतो. बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानाचे आधारावर या देशाचा कारभार चालत असल्याने बदलत्या काळात बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आंबडवे गावांचा बहुआयामी विकास करणे हे राज्यशासनाचे पहीले कर्तव्य मानतो व त्याकरिता सामाजीक न्याय विभागाच्या माध्यमातून पायाभुत सुविधांचे विकासासह येथील शैक्षणीक सोई सुविधांच्या विकासाकरिता मी आग्रही राहणार आहे.
घटनाकारांचे गाव रत्नागिरी जिल्ह्यात आहे व ही बाब जिल्ह्याचा लौकीक वाढविणारी आहे. बाबासाहेबांचे गाव ज्ञानाचे प्रतीक म्हणून विकसीत करण्यासाठी व जागतीक स्तरावर नावारुपास आणण्याकरिता शक्य ती सर्व प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले. राज्यातील विद्यार्थ्यांना भारतीय संविधान कळावे याकरिता राज्यशासन पंधरा तासांचा शिक्षणक्रम अभ्यासक्रमात आणणार असून हा अभ्यासक्रम पुर्ण करण्याऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला असून लवकरच या संदर्भातील शासन निर्णय होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचेवतीने आंबडवे येथे डॉ.बाबसाहेब आंबेडकरांचे स्मारक पुतळा उभा करणार असून हा पुतळा आंबडवे येथे कोठे असावा याचे सार्वमत घ्यावे. जगभरातील अभ्यासक व पर्यटकांना आर्कषणाचे केंद्र ठरले असे स्मारक व पुतळा राज्यशासनाच्या माध्यमातून उभा करु असे आश्वासन दिले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशीत चरित्र खंडाचे प्रकाशन आंबडवे येथे भव्य दिव्य कार्यक्रमांचे आयोजन करुन लवकरच करणार असल्याचे यावेळी सांगीतले. मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून आंबडवे या गावी सुरु करण्यात आलेल्या महाविद्यालयाचे संचालन सुयोग्य पध्दतीने व्हावे या करिता पुढाकार घेतला असून महाविद्यालयाच्या विविध समस्या सोडवण्याकरिता उपाययोजना सुरु केल्या महाविद्यालयाचे विविध प्रश्न महाविद्यालयास जमीन दान करणाऱ्या देणगीदारांचे प्रश्न यावर जातीने लक्ष घातले आहे. अर्धवट राहीलेल्या इमारतीसाठी चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून महाविद्यालयासाठी जमीन देणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीस रोजगार देण्याचे आश्वासन पुर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या यादीनुसार सहा जणांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची प्रक्रीया सुरु केली आहे. महाविद्यालायतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अपुऱ्या वेतनाची समस्या मार्गी लावली जाणार आहे.
या कार्यक्रमास आमदार योगेश कदम, रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती परशुराम कदम, माजी. जिल्हा परिषद सदस्य संतोष गोवळे, अण्णा कदम, माजी सभापती स्नेहल सकपाळ, भाई पोस्टुरे, प्रकाश शिगवण, जिल्हा बँकेचे संचालक रमेश दळवी ग्रामस्थ सुदाम सकपाळ, सुदर्शन सकपाळ, प्रांताधिकारी शरद पवार, तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलीस निरीक्षक शैलेजा सावंत, दलितमित्र दादासाहेब मर्चंडे, माझी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद जाधव, डॉ.अशोक साळुंखे, विनायक बोत्रे, मारुती काप, आदेश मर्चंडे, राजेश मर्चंडे, अल्पेश सकपाळ, प्रमोद सकपाळ, गणपत सकपाळ, राजेश कासरूंग, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमांचे अध्यक्षस्थान सुनील सकपाळ यांनी भुषविले तर सुचंसंचालन नरेंद्र सकपाळ यांनी केले या कार्यक्रमाचे निमीत्ताने स्मारकाचे परिसरात रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या निधीतून उभ्या करण्यात आलेल्या सभा मंडपाचे नामदार उदय सामंत यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजनसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जागृती मंडळाचे सर्व सभासद व ग्रामस्थांनी मेहनत घेतली.स्वागत समारंभाचे अध्यक्षस्थान सुनील सकपाळ यांनी भुषविले तर सुत्रसंचालन नरेंद्र सकपाळ यांनी केले.