जयगड किनार्‍यानजीक डॉल्फीनचा वावर,पर्यटकांचे प्रमुख आकर्षण; व्हीडीओ व्हायरल

रत्नागिरी,तालुक्यातील जयगड किनार्‍यानजीक डॉल्फीनचा वावर वाढला असून पर्यटकांचे ते प्रमुख आकर्षण ठरले आहे. मासेमारीसाठी गेलेल्या काहींनी याचे व्हीडीओ बनवून सोशल मिडीयावर व्हायरल केले आहेत; मात्र हे डॉल्फीन सकाळच्यावेळी समुद्रात दिसत असल्याचे मच्छीमारांनी सांगितले.
कोकणाला लाभलेल्या अथांग समुद्रकिनार्‍याबरोबरची भुरळ देश-विदेशातील पर्यटकांना पडते. त्यामुळे सुट्टीच्या हंगामात किनार्‍यावर प्रचंड गर्दी होते. पावसाळा संपला की ऑक्टोबर महिन्यात गुलाबी थंडीला आरंभ होतो. गेल्या काही वर्षांमध्ये रत्नागिरी, दापोली, गुहागर, राजापूर परिसरातील किनारी भागात डॉल्फीनचे दर्शन होत आहे. किनार्‍यापासून काही अंतरावर डॉल्फीनच्या झुंडी समुद्रात विहार करतात. ते पाहण्यासाठी पर्यटक वर्ग किनार्‍याकडे येऊ लागला आहे. सकाळी थंड वातावरणात ते किनारजवळ येतात; मात्र उन्हाचा कडाका वाढला की पुन्हा खोल पाण्याकडे निघुन जातात. रत्नागिरी तालुक्यात गणपतीपुळे येथे डॉल्फीन पाहण्यासाठी फेरीबोटीही ठेवण्यात आल्या आहेत. थंडी सरुन महिना झाला असला तरीही काळबादेवी, मिर्‍यासह जयगड परिसरात डॉल्फीनचे दर्शन होत आहे. जयगड किनार्‍याजवळ मच्छीमारांना डॉल्फीन आढळून आले आहे. मच्छीमारी नौकेच्या पुढे तीन डॉल्फीन पोहत सरकत होते. समुद्रात उंच सूर मारत खोल पाण्यात जाण्याचा थरार पर्यटकांसाठी पर्वणीच ठरतो. बोटींच्या बाजूने सूर मारते जाणारे डॉल्फीन पाहिले तर मच्छीमारी बोटींशी ते स्पर्धा करतात की काय असे वाटते. गर्मी वाढल्यामुळे सकाळच्या सत्रात तासभर त्यांचे दर्शन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button