
शौचालयातील मैल्यावर प्रक्रिया करून गांडूळ खतनिर्मितीचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प नाचणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत
शौचालयातील मैल्यावर प्रक्रिया करून गांडूळ खतनिर्मितीचा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प नाचणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत होत आहे. दिवसाला दहा हजार लिटर मैल्यावर प्रक्रिया केली जाणार असून, त्यामधून महिन्याला शंभर किलो गांडूळ खत बनणार आहे. यासाठी केंद्र शासनाच्या घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनांतर्गत १ कोटी २६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता मिशन कक्षामार्फत मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचे भूमिपूजन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले असून, दोन महिन्यात तो कार्यान्वित होणार आहे. मैला गाळ व्यवस्थापन प्रकल्प नाचणे (ता. रत्नागिरी) ग्रामपंचायतीत केला जाणार आहे. नाचणेसह शिरगांव, मिरजोळे, कुवारबांव, खेडशी या ग्रामपंचायत क्षेत्रातील कचर्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. मैला गाळ व्ययवस्थापन प्रकल्पासाठी १ कोटी २७ लाख ४१ हजार ८३९ रूपये लागणार आहेत. साडेतीनशे स्क्वेअरमीटर जागेमध्ये दिवसाला दहा हजार लिटर मैल्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com