
‘पोंभुर्ले’ ग्रंथाचे गाव होणे आनंददायी,मसापच्या कडून मंत्री उदय सामंत धन्यवाद
चिपळूण : मराठी भाषेचे आद्यपत्रकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले हे गाव महाराष्ट्र शासनाने ग्रंथाचे गाव केल्याबद्दल चा अतिशय आनंद होतो आहे. महाराष्ट्र शासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोंभुर्ले गावाची ‘पुस्तकाचे गाव’ म्हणून निवड केली आहे. पोंभुर्लेची निवड झाल्याचा विशेष आनंद होत असल्याच्या भावना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोकण विभागाचे प्रतिनिधी प्रकाश देशपांडे, नामवंत कवी अरुण इंगवले, शाहीर राष्ट्रपाल सावंत आदींनी व्यक्त केल्या असून त्यांनी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री ना. उदय सामंत यांना धन्यवाद दिले आहेत. मसाप यासाठी शासनाला सर्वतोपरी साहाय्य करेल असा विश्वास त्यांनी दिला आहे. याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. पोंभुर्ले गाव हे आद्य मराठी पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे जन्मगाव आहे. पोंभुर्लेला पुस्तकाचे गाव ही ओळख मिळाल्याने पोंभुर्ले गाव अधिक प्रकाशझोतात येणार आहे. १८१२ साली याच गावी बाळशास्त्रींचा जन्म झाला होता. १८३२ साली त्यांनी दर्पण हे पहिले मराठी भाषेतील पाक्षिक सुरु करून मराठी वृतपत्र सृष्टीचा पाया घातला होता. पोंभुर्लेला पुस्तकाचे गाव ही ओळख मिळाल्याने बाळशास्त्रींच्या कर्तृत्त्वाला उजाळा मिळणार आहे. शासनाने पुस्तकांचे गाव ही योजना पहिल्या टप्प्यात सहा महसुली विभागात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात भिलार येथे ४ मे २०१७ रोजी ‘पुस्तकांचे गाव’ या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली होती. या उपक्रमामुळे वाचन संस्कृती जोपासण्यासाठी मदत होणार आहे.
www.konkantoday.com