
नाटे येथे शिवजयंतीच्या मिरवणुकीत ढोलवादन करणाऱ्या तरुणाचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू
राजापूर : शिवजयंती उत्सवाच्या मिरवणुकीत जोरजोराने ढोलवादन करणाऱ्या नाटे येथील सचिन हरी ठाकूर या तरूणाला मिरवणुकीदरम्याने आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचे निधन झाले.
प्रतिवर्षाप्रमाणे तिथीनुरूप येणारा शिवजयंती उत्सव सोमवारी नाटे येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जात होता. सायंकाळच्या सत्रात भव्य मिरवणुकीचे सवाद्य आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत नाटेतील ज्येष्ठ ग्रामस्थ हरी उर्फ बबन ठाकूर यांचा कनिष्ठ चिरंजीव सचिन ठाकूर हा देखील सहभागी झाला होता . सचिन हा ढोलताशा पथकप्रेमी होता. कोणत्याही मिरवणुकीत ढोल घेऊन तो अग्रभागी असे. सोमवारी देखील त्याने शिवजयंती सोहळ्याच्या उत्साहात आधी ताशा वाजवला त्यानंतर बराच वेळ ढोलवादन केले . या दोन्ही वाद्यांच्या वादनानंतर त्याने झांज वाजवण्यास घेतली. यादरम्यानच त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला उलट्या झाल्या. रक्तदाब मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याला धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचारासाठी नेण्यात आले. तेथून अधिक उपचारार्थ रत्नागिरी येथे नेत असताना वाटेतच त्याचे निधन झाले. सचिनच्या आकस्मिक निधनाने नाटे गाव आणि परिसर हळहळला. त्याच्यावर मंगळवारी नाटेत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी अख्खा गाव त्याला निरोप द्यायला लोटला होता .