रत्नागिरीत प्रथमच कातळशिल्प पर्यटन महोत्सवाचे आयोजन
रत्नागिरी : गेल्या दहा वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर कातळ खोदचित्रांना राजाश्रय मिळू लागला आहे. पर्यटक मोठ्या संख्येने येथे येण्याकरिता आणि अपरिचित पर्यटनस्थळांची माहिती पर्यटकांना देण्यासाठी पहिला कातळशिल्प पर्यटन महोत्सव येत्या २६ व २७ मार्चला आयोजित केला आहे. पर्यटन संचालनालयाच्या कोकण विभागाचे उपसंचालक हनुमंत हेडे, निसर्गयात्री संस्थेचे संचालक सुधीर रिसबूड यांनी आज शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत यासंदर्भात विस्तृत माहिती दिली.
थिबा पॅलेस येथे होणाऱ्या महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महोत्सवात कातळशिल्प सचित्र माहिती प्रदर्शन, कोंकण भौगोलिक आणि जैवविविधता छायाचित्र, पारंपारिक कला वस्तू प्रदर्शन, कातळशिल्प माहिती देणारी कार्यशाळा, सादरीकरण, शोधकर्ते यांच्या बरोबर मुलाखत आणि गप्पा गोष्टी, आडवळणावरचे कोंकण- सादरीकरण सांस्कृतिक कार्यक्रम, खाद्य जत्रा, सायकल रॅलीचे आयोजन केले आहे.
अश्मयुगीन कातळशिल्प रूपी वारसा ठेवा ही रत्नागिरी जिल्ह्याची वेगळी ओळख होत आहे. या ठेव्याच्या प्रचार प्रसार आणि प्रसिद्धीसाठी पर्यटन संचालनालय कोकण विभाग व निसर्गयात्री संस्था, सुवर्णसूर्य फाउंडेशनने याचे नियोजन केले आहे. कातळशिल्प पर्यटन महोत्सव घेण्यास पर्यटन विभागाने मंजुरी दिली आहे. थिबा पॅलेस येथे महोत्सवाचे २६ ला सकाळी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. दोन्ही दिवशी सकाळी १० ते दुपारी २ आणि सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत महोत्सवात विविध कार्यक्रम होतील. यात पर्यटकांसह विद्यार्थी, अभ्यासक, पर्यटन संस्था, रत्नागिरीकर आणि कातळशिल्पाच्या गावातील ग्रामस्थ उपस्थित राहणार आहेत.
महोत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये दगडांमधील प्रकार, दगडांपासून आदिमानव हत्यारे कशी तयार करत होता याचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक प्रा. डॉ. तोसोपंत प्रधान दाखवणार आहेत. कातळ खोद चित्रांच्या भेटवस्तूंचे प्रदर्शन, वाळू व अन्य माध्यमातून खोद चित्रांच्या प्रतिकृती मांडण्यात येणार आहेत. देवरुखमधील डीकॅड कॉलेज ऑफ आर्टसचे विद्यार्थी कला वस्तू प्रदर्शन व त्यातील करिअर यावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पद्मश्री पुरस्कार प्राप्त गंगाराम गंगावणे व सहकारी चित्रकथी कला प्रदर्शन मांडणार आहेत. बांबूपासून विविध कला वस्तू प्रदर्शन आणि ओरिगामी आर्ट प्रदर्शन नरेंद्र घाणेकर सादर करणार आहेत.
www.konkantoday.com