लांजा पोलिसांमुळे साडेबारा वर्षांनी झाली बेपत्ता व्यक्तीची कुटुंबाशी भेट

लांजा : मूळचा सांगली येथील असलेला आणि गेली साडेबारा वर्षे बेपत्ता असलेला 50 वर्षीय व्यक्ती लांजा पोलिसांच्या सतर्कतेमुळे सापडला असून याबद्दल कुटुंबियांनी लांजा पोलिसांचे विशेष आभार मानले. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हनुमान गणपत शिंदे (वय वर्षे 50) हे साडेबारा वर्षे बेपत्ता होते. ही व्यक्ती सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील चिंचणी आवक येथील आहे. मे 2009 मध्ये रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची फिर्याद कुटुंबीयांच्यावतीने करण्यात आली होती. हनुमान शिंदे हा डोक्याने थोडासा वेडसर असल्याने कुटुंबीयांनी त्याला रत्नागिरी येथील मनोरुग्णालयात आणले होते. मे 2009 मध्ये हनुमान शिंदे यांना रत्नागिरी येथे आणले जात असताना काही काळासाठी रत्नागिरी मारुती मंदिर येथे गाडी थांबवून कुटुंबीय चहा नाष्टासाठी थांबले होते. यावेळी हनुमान हा गाडीत होता. मात्र कुटुंबीय चहा नाश्ता करून गाडीत येण्यापूर्वीच हनुमान हा गाडीतून उतरून गायब झाला होता. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो न सापडल्याने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर तपास सुरू होता. या पार्श्वभूमीवर लांजा पोलिस ठाण्याचे पथक यामध्ये पोलिस उपनिरीक्षक तेजस्विनी पाटील, उपनिरीक्षक प्रशांत जाधव ,पोलीस नाईक दिनेश आखाडे, महिला पोलीस नाईक संतोषी मिसाळ, महिला हेडकॉन्स्टेबल तृप्ती सावंत देसाई, महिला पोलीस एन. पी. खामकर आदी सर्वजण रविवारी 13 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान गावभेट दौरासाठी चालले असताना वाकेड याठिकाणी एक वेडसर व्यक्ती रस्त्याने चालत जाताना दिसली. यावर लांजा पोलिसांनी गाडी थांबवली. त्यानंतर येथील ग्रामस्थांनी देखील पोलिसांना या वेडसर व्यक्तीबद्दल माहिती दिली. पोलिसांनी सहजरित्या या वेडसर व्यक्तीची चौकशी करण्यास सुरुवात केली असता त्या व्यक्तीने आपले नाव आणि पत्ता सांगितले. त्यानंतर लांजा पोलिसांनी या वेडसर व्यक्तीला लांजा पोलिस ठाण्यात आणले. त्याने सांगितलेल्या पत्त्यावर सांगली पोलिसांशी संपर्क साधून या पत्त्यावर हनुमान शिंदे यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असता त्याने दिलेला पत्ता हा बरोबर असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button