रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छिमार हक्क संघटनेच्या माध्यमातून मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
पर्सनेट द्वारे एल ई डी लाइटचा वापर करून बेकायदेशीर मासेमारी करणाऱ्यांच्या विरोधात पारंपरिक मच्छिमार आक्रमक झाले असून त्यांनी रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छिमार हक्क संघटनेच्या माध्यमातून मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.अवैध मासेमारीविरोधात पुरावे देऊनही मत्स्यव्यवसाय खाते त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सुद्धा या संघटनेने केला आहे.
राज्य शासनाने राज्याच्या जलधि क्षेत्रात होणारी पर्ससीन मासेमारी १ जानेवारी ते ३१ ऑगस्ट या कालावधीत संपूर्णतः बंदी केलेली आहे. तसे आदेश सर्व जिल्ह्यातील मत्स्य आयुक्तांना दिलेले असूनसुद्धा रत्नागिरी मिरकरवाडा मासेमारी बंदरातून राजरोसपणे पर्ससीन मासेमारी केली जात आहे आणि याबाबत सहाय्यक आयुक्त , मत्स्यव्यवसाय , रत्नागिरी यांचे निदर्शनास या गोष्टी आणून दिलेल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आमच्या विविध संघटनांनी लेखी निवेदने दिलेली आहेत. तरी देखील सध्या राज्य शासनाचे व केंद्र शासनाचे आदेश धाब्यावर बसवून पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने एल. ई. डी. लाईटचा वापर करून मोठ्या प्रमाणात सुमारे ६०० ते ७०० नौका पर्ससीन जाळ्याच्या सहाय्याने मासेमारी करीत आहेत. या बाबत सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्याकडे पुराव्यासह या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आहेत असे या निवेदनात म्हटले आहे.
त्याशिवाय आज सहाय्यक मत्स्य आयुक्त यांचे कार्यालयासमोर २ ते ४ मच्छिमार मंडप टाकून उपोषणास बसले आहेत, त्यांच्या नौका राजरोस सुरु असून मोठ्या प्रमाणात मासेमारी करत आहेत. याबाबत सखोल चौकशी व्हावी व तात्काळ पर्ससीन जाळ्यांच्या सहाय्याने होणारी तसेच एल . ई . डी . लाईटच्या सहाय्याने होणारी पर्ससीन मासेमारी तात्काळ बंद करून नौकांवरती त्वरित शासनाच्या नियमाप्रमाणे दंडात्मक कारवाई व्हावी अशी मागणी रत्नागिरी तलुका शाश्वत मच्छिमार हक्क संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
www.konkantodaty.com