
अन्यायाविरोधात आवाज उठवला तरच महिलांचे सबलीकरण : अभिनेत्री चिन्मयी राघवन
साखरपा : महिलांनी आपल्यावरील अन्यायाविरूध्द आवाज उठवणे गरजेचे असून प्रत्येक अन्यायाविरूध्द आवाज उठवला तरच महिला सबलीकरण होईल, असे प्रतिपादन मराठी अभिनेत्री चिन्मयी राघवन यांनी साखरपा येथे व्यक्त केले. मारुतीकाका जोयशी यांच्या निवासस्थानी मंगळवारी जागतिक महिला दिन वैदेही सावंत यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला. यामध्ये नारी सन्मान व पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा वैदेही सावंत यांनी हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगून विधवा, परित्यक्ता, अपंग महिलांसाठी विशेष योजना राबवल्या पाहिजेत, असे सांगितले. महिलांनी न डगमगता स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजे, असे पोलिस अधिकारी प्रतिभा साळुंखे यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, प्रबोधनकार काका जोयशी यांनी मनोगत व्यक्त केले. विलास डिके, प्रा. संदीप येलये, शाहीर वसंत भातडे, हरिश्चंद्र गोरूले, तानाजी कुळ्ये, शिवाजी बोटके, आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरेश सुवरे यांनी केले. या कार्यक्रमात विधवा महिलांना व्यासपीठावर आणून त्यांच्याहस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले. तसेच ज्या महिलांनी पतीच्या मृत्यूनंतर अंगावरील अलंकार काढले नाहीत, अशा महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तर ज्या महिलांना पतीच्या मृत्यूनंतर अंगावरील अलंकार घालायचे होते त्यांचे संमत्रीपत्र घेऊन त्यांच्या संमतीने हिरव्या बांगड्या भरण्यात आल्या.