
शासकीय अध्यापक महाविद्यालयात, शिवजयंती, विद्यार्थ्यांच्या नाट्यस्पर्धा
रत्नागिरी/- शालेय उपक्रमांमध्ये निरनिराळ्या महापुरुषांच्या जयंत्या आणि स्मृतिदिनांचे कार्यक्रम हा एक महत्त्वाचा भाग असतो. अनेक शाळांमध्ये हे कार्यक्रम देखणे आणि उल्लेखनीय रीतीने सादर केले जातात. त्यासाठी मार्गदर्शन आणि परिश्रम करण्यात प्रमुख भूमिका असते शिक्षकांची. त्यांना स्वतःला या कार्यक्रमांच्या आयोजनाचा सराव मिळतो ते जिथे घडतात त्या अध्यापक प्रशिक्षण महाविद्यालयात. रत्नागिरी शहरातील ‘शासकीय अध्यापक महाविद्यालया’त नुकताच झालेला शिवजयंती सोहळा हे या प्रकारच्या सरावाचंच एक उदाहरण.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता या महाविद्यालयात शिवजयंती सोहळ्याचा प्रारंभ झाला. उद्या शाळाशाळांतून अध्यापन करण्यासाठी प्रशिक्षण घेत असलेल्या छात्राध्यापक युवक युवतींचा त्यात उत्साही सहभाग होता, आणि यात महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रमा भोसले, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले होते. ढोलताशांच्या गजरात आणि लेझीमच्या तालावर सर्वांचे पाय थिरकत होते, आणि मनामनात उमटत होते शिवछत्रपतींबद्दलच्या अभिमानाचे तरंग! महाविद्यालयाच्या विस्तीर्ण आवारात अर्धा तास मिरवणूक चालली होती, आणि त्यानंतर झाली छात्राध्यापकांची भाषणे, पोवाडे आणि गीतगायन.
विद्यार्थ्यांच्या नाट्यस्पर्धा हा या दिवशी झालेला दुसरा उपक्रम. या स्पर्धेतील विजेत्यांना ‘संभाजी बाबुराव भोसले पुरस्कृत’ बक्षिसे देण्यात आली. प्रथम बक्षीस १००० रुपये, द्वितीय ७०० रुपये आणि तृतीय ५०० रुपये आणि उत्कृष्ट स्त्री अभिनय तसेच आठ उत्तेजनार्थ बक्षिसे वितरित करण्यात आली. नाट्यस्पर्धेच्या बक्षिसांचे मानकरी :- प्रथम क्रमांक – शिव यात्रा (प्रथम वर्ष बीएड), द्वितीय क्रमांक – शिवजन्मोत्सव सोहळा (द्वितीय वर्ष बीएड) आणि तृतीय क्रमांक स्वराज्याची शपथ (द्वितीय वर्ष बीएड. उत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मंजिरी रजपूत या द्वितीय वर्षाच्या छात्राध्यापिकेला मिळाले. प्राचार्या डॉ. रमा भोसले आणि सर्व प्राध्यापक वर्गाने विजेत्यांचे अभिनंदन केले. या उपक्रमासाठी प्राचार्यांच्या नेतृत्वाखाली ‘समता गटा’चे मार्गदर्शक श्री. प्रवीण चाकोते आणि इतिहास मंडळाच्या मार्गदर्शिका डॉ. राजश्री देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परीक्षक म्हणून डॉ. मजगावकर आणि प्रा. निनाद तेंडुलकर यांनी काम पाहिले.
www.konkantoday.com