
सुट्ट्यांचा हंगाम आल्यामुळे पर्यटकांचा ओढा कोकणाकडे
शालेय परीक्षा संपून मे महिन्यातील सुट्टीचा कालावधी सुरू झाला आहे. या सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी पर्यटक आता रत्नागिरी, सिंधुदुर्गातील पर्यटन स्थळांकडे वळत आहेत. त्यामुळे मिळालेल्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक कोकणाकडे येत आहेत.११ मेपासून मोठ्या संख्येने पर्यटक जिल्ह्यात दाखल होतील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता, तो खरा ठरला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गणपतीपुळे, पावस, राजापूर, मंडणगड, दापोली अशा पर्यटन स्थळांकडे पर्यटकांचा ओघ वाढला आहे. त्याचबरोबर मालवण तालुक्यातील दांडी, चिवला, देवबाग, तारकर्ली, वायरी, आचरा, तळाशील, वायंगणी समुद्र किनारीही पर्यटकांची वर्दळ पहायला मिळत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तिसर्या टप्प्यात महाराष्ट्रात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघासह पश्चिम महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दुसरा शनिवार आणि रविवार लागून आलेल्या सुट्टीमुळे रविवारपासून मालवणात पर्यटकांची गर्दी दिसून येत आहे.ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ला, भ्रमंती, राजकोट येथील नवीन शिवपुतळा, पॅरासिेलिंग आणि साहसी जलक्रीडांना पर्यटकांची पसंती दिसून येत आहे. सकाळी आणि सायंकाळी अशा दोन्ही सत्रात पर्यटकांनी समुद्र स्नानासाठी किनारे गाठले. शनिवार, रविवार किनारपट्टी भागाकडे जाणारे सर्वच रस्ते वाहनांनी गजबजून गेले होते. पोलीस प्रशासनाकडून वाहतुकीची कोंडी दीर्घकाळ राहू नये म्हणून खबरदारी घेतली जात होती. www.konkantoday.com