मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात एन. एस. एस.- राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत मार्गदर्शनपर व्याख्यान
मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उप परिसरात एन एस एस विभागातर्फे दिनांक 14 फेब्रुवारी रोजी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. एन एस एस च्या स्वयंसेवकांना राष्ट्रीय सेवा योजना विभागात राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती मिळावी या उद्देशाने आयोजित व्याख्यानात गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील एन एस एस विभागाच्या कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सोनाली कदम मॅडम प्रमुख व्याख्याता म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमातील प्रास्ताविकात रत्नागिरी उप परिसराचे संचालक डॉ. किशोर सुखटणकर यांनी एन एस एस ची स्थापना, त्यामागचं उद्दिष्ट , एन एस एस ची कार्यप्रणाली समजावताना या माध्यमातून कसा व्यक्तिमत्त्व विकास होऊ शकतो याबाबत विवेचन केले. तसेच भविष्यात होणाऱ्या एन. एस. एस. विभागातील उपक्रमांचा थोडक्यात आढावा घेतला. तसेच कल्पकता वापरून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत समाजोपयोगी व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविता येऊ शकतात असे प्रतिपादन त्यांनी केले.
मार्गदर्शक म्हणून उपस्थित डॉ. सोनाली कदम मॅडम यांनी राष्ट्रीय सेवा योजने तुन वर्षभरात चालणाऱ्या विविध प्रकल्पांची माहिती दिली.असे प्रकल्प करताना विद्यार्थ्यांमध्ये स्वयंसेवी वृत्ती ,प्रामाणिकपणा,स्वयंशिस्त, आत्मियता,राष्ट्र भक्ती,नेतृत्वगुण वाढीस लागतात असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. विविध समाजसेवी संस्था व शासकीय संस्थांशी समन्वय साधून करता येणाऱ्या प्रकल्पा विषयी सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले.एन एस एस मार्फत राबवल्या जाणाऱ्या राज्य व राष्ट्रीय पातळीवरील विविध शिबिरां बद्दल डॉ. कदम यांनी माहिती दिली.तसेच अशा शिबिरांमधून मिळणारे अनुभव भविष्यातील संधींसाठी निश्चित उपयुक्त ठरतात असे त्यांनी मत व्यक्त केले. पथनाट्याच्या माध्यमातून प्रभावीपणे जनजागृती केली जाऊ शकते, विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून त्यांच्या तील सुप्त गुणांना वाव देऊन जलसंधारण, स्वच्छता,वृक्ष लागवड मोहीम,रक्तदान,जनजागृती असे अनेकविध उपक्रम यशस्वीपणे राबविता येतात असे त्या म्हणाल्या.
एन एस एस स्वयंसेवकांनी ही व्याख्यात्यांशी संवाद साधला.रत्नागिरी उपपरिसर चे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर तसेच सहाय्यक कुलसचिव श्री. अभिनंदन बोरगावे यांचे सदर व्याख्यानाच्या आयोजनात मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमाच्या यशस्वी पूर्ततेसाठी प्रा.विजय गुरव ,प्रा.सोनाली मेस्त्री,प्रा.निलेश रोकडे यांनी सहकार्य केले. एन एस एस स्वयंसेविका कु. शिवानी सुर्वे हिने सर्वांचे आभार मानले.