
रत्नागिरीतील स्वा. सावरकर नाट्यगृहात राज्य हौशी नाट्य स्पर्धेला प्रारंभ
रत्नागिरी : शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृह येथे ६० व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे उद्घाटन झाले. २०२१-२२ या वर्षातील ही स्पर्धा रत्नागिरी केंद्रावरही होत आहे. उद्घाटन कार्यक्रमाला जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुमती जाखड, अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्याध्यक्ष समीर इंदुलकर, ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता केळकर, डॉ. पी. पी. कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मागील 2 वर्ष कोरोनामुळे नाट्यप्रयोग सादर करता आले नाहीत. मात्र आता स्पर्धा सुरू झाल्याने नाट्य रसिकांना याचा आनंद लुटता येणार आहे. कलाकारांमध्येही उत्साहाचे वातावरण असल्याचे स्पर्धा समन्वयक नंदू जुवेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.