मोठ्या बक्षिसांचे आमिष दाखवून ग्रामस्थांना फसवणारी टोळी सक्रिय
सकपाळवाडीतील अनेक महिलांना आवळा देऊन कोहळा काढला
साखरपा- देवरुख तालुक्यातील डोंगर,पाड्यात राहणाऱ्या भोळसट ग्रामस्थांच्या अज्ञानी पणाचा गैरफायदा घेऊ टोळी कार्यरत असल्याचे सकपाळवाडी (बौद्धवाडी), साखरपा येथील ग्रामस्थांच्या फसवणुकी वरून उघडकीस येत आहे.
ग्रामीण दूरवरच्या भागामध्ये एम. एच.02 पासिंग निळ्या ओमनी द्वारे आलेल्या दोन महिला आणि दोन युवकांनी सकपाळ वाडीतील वयोवृद्ध सुनंदा शांताराम सकपाळ यांना शंभर रुपयाची लकी ड्रॉ ची पावती फाडायला लावली. त्यामध्ये एक फ्रिज आणि टीव्हीचे आपण लकी विनर झाल्याचे संबंधित महिला ज्येष्ठ नागरिकाला सांगितले व दहा हजार रुपये आपणास रोख सुद्धा सायंकाळी कंपनीद्वारे देण्यात येणार असल्याच्या भुलथापा दिल्या.यावेळी पाच हजार रुपये घेऊन कमी किमतीची गॅस शेगडी आणि एक पाणी ओढणारे विद्युत मोटर पंप किंमत अंदाजे दोन्ही वस्तूंची 3000/ देऊन जवळपास दोन हजार रुपयाची फसवणूक या महिलेची टोळीद्वारे करण्यात आलेली आहे.
सुनंदा शांताराम सकपाळ यांच्याप्रमाणेच इतरही दोन महिलांकडून पाच पाच हजार रुपये घेऊन हलक्या दर्जाच्या वस्तू ह्या कुटुंबीयांच्या कपाळी मारून ही टोळी रफूचक्कर झाली आहे.
मोठमोठ्या किमती वस्तू आणि रोख रकमेचे आमिष ग्रामीण भागातील नागरिकांना दाखवून कित्येकांना या टोळीकडून लुबाडले गेले असल्याची व भविष्यातही लुबाडले जाण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाने अशा टोळ्यांची मुसके आवळण्याची गरज निर्माण झाली आहे, ज्यामुळे गरीब आणि कष्टकऱ्यांची फसवणूक होणार नाही.