साखरपुड्यावरून घरी येताना पांगरी येथे कार उलटून फणसोप येथील एकजण ठार; चार जखमी
——————————————————
रत्नागिरी : देवरूख-रत्नागिरी मार्गावर संगमेश्वर येथे पांगरी येथील कड्याचा पऱ्या येथे मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट डिझायर कार उलटून अपघात घडला. यामध्ये फणसोप येथील एकजण ठार तर अन्य चारजण जखमी झाले आहेत. याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गोपीनाथ गोपाळ कुंभार (वय-६४, रा. फणसोप, ता. रत्नागिरी) असे अपघातात मृत पावलेल्या वृध्दाचे नाव आहे. गोपीनाथ कुंभार यांचा पुतण्या कुणाल किरण कुंभार याचा देवरूख नजीकच्या पाटगाव येथे मंगळवारी साखरपुडा होता. साखरपुड्याचा कार्यक्रम आटोपून स्विफ्ट डिझायर कारने (MH 12 / FY- 5844) पाचजण फणसोप येथे परतत असताना पांगरी कड्याचा पऱ्या येथे कार आली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या चरात जाऊन उलटली. या अपघातात गोपीनाथ कुंभार यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. तर कारमधील कुणाल किरण कुंभार, रूपेश रमेश पावसकर, किरण भास्कर कुंभार, कविता गोपीनाथ कुंभार हे चारजण जखमी झाले. त्यांच्यावर रत्नागिरीत उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. दरम्यान, अपघाताची खबर कुणाल कुंभार याने देवरूख पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक पाटील, पोलिस नाईक जावेद तडवी, पोलिस नाईक संदेश जाधव, पोलिस नाईक किशोर जोयशी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. देवरूख पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.