
आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण कक्ष
रत्नागिरी : यंदा फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. त्यामुळे उष्माघाताची शक्यता वर्तवली जात आहे. हे लक्षात घेऊन जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे विशेष उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.यंदा उन्हाळ्यात पारा ३८ अंशापर्यंत वर गेलेला होता. आर्द्रता अधिक असल्यामुळे जिल्ह्यात उन्हाचा कडाका अधिकाधिक जाणवत आहे. तालुकास्तरापासून ते प्राथमिक आरोग्यकेंद्र पातळीपर्यंत नियंत्रण कक्ष स्थापन करण्याचा निर्णय जिल्हा परिषद प्रशासनाने केला आहे.
या कक्षामध्ये एक पथक तयार करण्यात आले आहे. यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, समुदाय आरोग्य कर्मचारी, आरोग्य साहाय्यक, चतुर्थ श्रेणी कर्मचारी यांचा समावेश आहे. तसेच सुस्थितीत वाहन, प्रथमोपचार पेटी, अत्यावश्यक औषधे व साहित्य, उष्माघात औषधांचे कीट सज्ज ठेवण्याच्या सूचना जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. अनिरूद्ध आठल्ये यांनी प्राथमिक आरोग्यकेंद्रांना दिले आहेत. यामध्ये पुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे फिकट रंगाचे सैलसर कपडे वापरा, उन्हात गॉगल, छत्री, टोपी वापरा. ओलसर पडदे, कुलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा. शक्य तो उन्हाच्यावेळेत घराबाहेर पडू नका. कष्टाची कामे उन्हात करू नका. पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका, उष्माघाताची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्यकेंद्रात संपर्क साधा, असे आवाहन करण्यात आले आहे.