जिल्ह्याच्या पोलिस दलाची डिजिटल भरारी
रत्नागिरी, लांजात आजपासून वापरणार क्राईम मॉनेटरिंग सिस्टीम; पोलिस अधीक्षक डॉ. गर्ग यांचा पुढाकार
रत्नागिरी : पोलिस अधीक्षक मोहितकुमार गर्ग यांनी गुन्हे उघडकीस आणताना सुसुत्रता यावी म्हणून डेटा तयार करण्यासाठी क्राईम मॉनेटरिंग सिस्टीम (गुन्हे नियंत्रण प्रणाली) विकसित केली आहे. या सॉफ्टवेअरचा वापर मंगळवार दि. 1 फेब्रुवारीपासून रत्नागिरी व लांजा पोलिस ठाण्यात सुरू होणार आहे. गुन्हे उकल करताना एकत्रित माहिती गोळा करून डेटा तयार करण्यासाठी क्राईम मॉनेटरिंग सिस्टीम ही संकल्पना राबवण्यात येत आहे. या सॉफ्टवेअरची निर्मिती रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने केली आहे.
कशी आहे ही प्रणाली :
एखादा गुन्हा उघडकीस आल्यानंतर संबंधित सर्व विभागाचे सहकार्य फार महत्त्वाचे ठरते. गुन्हा उघडकीस आणताना सर्व यंत्रणांशी सुसुत्रता साधता यावी यासाठी ही प्रणाली काम करणार आहे. यासाठी सर्व पोलिस ठाण्याचे अंमलदार यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.
आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर तपास कामात करता यावा यासाठी हा प्रयत्न आदर्शवत आहे. गुन्ह्याचा डेटा या प्रणालीत कायमस्वरूपी राहणार आहे. कोर्टात एखाद्या साक्षीदारांनी आपला जबाब फिरवला तरी पोलिसांकडे नेमका कोणता जबाब त्यांनी दिला होता, याची पडताळणी या प्रणालीद्वारे केली जाणार आहे. ही प्रणाली विकसित करण्यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीद्वारे पोलिस दलाला निधी वर्ग करण्यात आला होता.